भंडारी समाज समितीची निवडणूक होणार त्यांच्याच देखरेखीखाली

प्रतिनिधी। गोवन वार्ता
पणजी : गोमंतक भंडारी समाज समितीमध्ये दोन गटांत सुरू असलेल्या वादाच्या पार्श्वभूमीवर सरकारने प्रशासकाची नियुक्ती केली आहे. निवृत्त सरकारी अधिकारी एस. व्ही. नाईक हे सहा महिन्यांसाठी प्रशासक म्हणून जबाबदारी सांभाळणार आहेत. भंडारी समाज समितीची निवडणूक घेण्याची जबाबदारी त्यांच्यावर असणार आहे.
सहकारी संस्था कायद्याच्या कलम २० ए खाली हा आदेश जारी झाला आहे. भंडारी समाज समितीच्या दोन गटांत वाद होता. उपेंद्र गावकर आनी देवानंद नाईक यांच्या पॅनेलने आपलीच समिती निवडून आल्याचा दावा केला होता. या दोन समितीमधील वाद न्यायालयात पोहोचला होता. समितीवर प्रशासक नेमण्याचे निवेदन सरकारने न्यायालयात केले होते. त्यानंतर आता प्रशासकाची नियुक्ती झाली आहे.
भंडारी समाज समितीचा दैनंदिन व्यवहार आता प्रशासक एस. व्ही. नाईक पहाणार आहेत. सहा महिन्यांपर्यंत वा नवी समिती ताबा घेईपर्यंत त्यांच्याकडे कारभार असेल. भंडारी समाज हा गोव्याचा सर्वांत मोठा समाज असल्याने या समितीचा कारभार तसेच घडामोडींकडे राज्याचे लक्ष असते. राज्याच्या राजकारणातही हा समाज मोलाची भूमिका बजावतो. आता फोंडा मतदारसंघासाठी पोटनिवडणूक होणार आहे. तसेच नगरपालिकांच्या निवडणुकाही होणार आहेत. या पार्श्वभूमीवर भंडारी समाज समितीवर झालेली प्रशासकाची नियुक्ती महत्त्वाची घटना ठरते.