आंदोलकांची घोषणाबाजी; विधानसभेच्या सुरक्षाव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह

सभापतींच्या तक्रारीवरून पर्वरी पोलिसांनी चौघांना केली अटक


11 hours ago
आंदोलकांची घोषणाबाजी; विधानसभेच्या सुरक्षाव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह

विधानसभेत फलक दाखवून सरकारचा निषेध करताना मिराबाग येथील प्रस्तावित बंधाऱ्याला विरोध करणारे आंदोलक. (नारायण पिसुर्लेकर)
प्रतिनिधी। गोवन वार्ता
पणजी : अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा पहिला दिवस वादळी आणि नाट्यमय घडामोडींचा ठरला. शुक्रवारी राष्ट्रगीत झाल्यानंतर कामकाजाला सुरुवात होताच, मिराबाग येथील प्रस्तावित बंधाऱ्याला विरोध करणाऱ्या आंदोलकांनी अनपेक्षितपणे विधानसभेच्या प्रेक्षक गॅलरीतून फलक झळकावून सरकारचा निषेध नोंदवला. या प्रकारामुळे विधानसभेच्या अत्यंत कडक मानल्या जाणाऱ्या सुरक्षा व्यवस्थेवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले. आंदोलकांच्या या कृतीवर मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी तीव्र संताप व्यक्त करून संबंधितांना तत्काळ अटक करण्याची मागणी केली. दरम्यान, पर्वरी पोलिसांनी याप्रकरणी सभापती गणेश गावकर यांच्या तक्रारीनुसार आपा नाईक, उपेंद्र नाईक, उमेश नाईक, हेमंत भंडारी यांना प्रतिबंधात्मक कारवाईखाली अटक केली. संशयित विधानसभा अधिवेशनाचे अधिकृत प्रवेश पास घेऊन आतमध्ये आले होते. त्यांनी फलक लपवून आणले असावेत, असा पोलिसांना संशय आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक राहुल परब यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे. दरम्यान, शनिवारी संशयितांना बार्देश उपजिल्हाधिकाऱ्यांसमोर हजर करण्यात येणार आहे. त्यांना विधानसभेचे पास कोणी पुरवले, याची सखोल चौकशी सुरू आहे.
सत्ताधारी-विरोधकांमध्ये जोरदार खडाजंगी
या घटनेनंतर मिराबाग बंधाऱ्याच्या मुद्द्यावरून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये शाब्दिक युद्ध रंगले. मिराबाग येथील आंदोलक २७ दिवस आंदोलन करत आहेत, तरीही सरकार गप्प का, असा सवाल आमदार विजय सरदेसाई यांनी विचारला. याला उत्तर देताना जलस्रोतमंत्री सुभाष शिरोडकर यांनी विरोधकांवर गंभीर आरोप केले. राजकीय फायद्यासाठी विरोधक आंदोलकांना पुढे करून प्रकल्पाबाबत संभ्रम निर्माण करत आहेत, असे शिरोडकर म्हणाले.
कुणाचेही नुकसान होणार नाही : मुख्यमंत्री
मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत म्हणाले, जलस्रोत विभागाच्या अभियंत्यांनी या प्रकल्पाचे महत्त्व आणि तांत्रिक बाजू स्थानिकांना व पंचायतीला समजावून सांगितली आहे. आंदोलकांनीही माझी भेट घेतली होती. या प्रकल्पामुळे कुणाचेही वैयक्तिक किंवा मालमत्तेचे नुकसान होणार नाही, असे ठाम आश्वासन आपण त्यांना दिले आहे.