खामेनेई पुत्र मोजतबा बनले इराणचे सर्वोच्च नेते

अमेरिकेच्या भूमिकेकडे जगाचे लक्ष

Story: वेब डेस्क। गोवन वार्ता |
3 hours ago
खामेनेई पुत्र मोजतबा बनले इराणचे सर्वोच्च नेते

तेहरान : अमेरिका इस्त्रायलच्या (America-Israel) हल्ल्यात मारले गेलेले इराणचे (Iran) सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खामेनेई यांचे पुत्र मोजतबा खामेनी (Mojtaba Khamenei)  यांची इराणच्या सर्वोच्च नेतेपदी निवड करण्यात आली आहे. इराणच्या सर्वोच्च नेतेपदी कुणाची निवड होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. आता ही प्रतिक्षा संपली असून, इराणने मोजतबा खामेनेई यांची निवड करून अयातुल्ला अली यांचा वारसा पुढे नेण्यात येणार असल्याचा संदेश दिला आहे. 

अमेरिकेचा विरोध डावलून इराणने सोमवारी मोजतबा खामेनेईयांची त्यांचे वडील अयातुल्ला अली खामेनेई यांच्या जागी सर्वोच्च पदी‌ निवड केली आहे. अमेरिका व इस्त्रायल बरोबर सुरू असलेल्या युद्धाला एक आठवडा होऊन गेला आहे. त्याला न जुमानता इराणने मोजतबा खामेनेई यांची सर्वोच्च पदी निवड करीत सत्तेवर कंट्टरपंथीयांची पकड अजून मजबूत असल्याचे दाखवून दिले आहे.

मोजतबा खामेनेई मध्यम श्रेणीतील धर्मगुरू आहेत व त्यांची इराणच्या सुरक्षा दलांवर मोठा प्रभाव आहे. त्यांचे वडील अयातुल्ला अली खामेनेई यांचे अवाढव्य व्यावसायिक जाळेही त्यांच्या नियंत्रणाखाली आहे. ‘अॅसेंब्ली ऑफ एक्सपर्ट्स’ या ८८ धर्मगुरूंचा समावेश असलेल्या समितीकडून ही निवड करण्यात येते. त्यात सुरूवातीपासूनच मोजतबा यांचे नाव आघाडीवर होते. तेहरानच्या वेळेनुसार असेंब्लीने प्रसिद्ध केलेल्या निवेदनात म्हटले आहे की, असेंब्ली ऑफ एक्सपर्ट्सने अयातुल्ला सय्यद मोजतबा हुसेनी खामेनेई यांची इस्लामिक र‌िपब्लिक ऑफ इराणच्या पवित्र व्यवस्थेचे सर्वोच्च नेते म्हणून नियुक्ती केली आहे.

इराणच्या सर्व सरकारी आणि धोरणात्मक बाबींमध्ये अंत‌िम निर्णय घेण्याचे अधिकार आता मोजतबा यांना प्राप्त झाले आहेत.  त्यामुळे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यापुढे काय भूमिका घेतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. 

अमेरिकेचे अध्यक्ष राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प मोजतबा यांच्या नियुक्तीमुळे संतापण्याची शक्यता आहे. यापूर्वी त्यांनी म्हटले होते की, इराणचा सर्वोच प्रमुख निवडण्याच्या प्रक्रियेत अमेरिकेचा सहभाग असायला हवा. ‘आमची मंजुरी घेतली नाही तर ते जास्त काळ टिकणार नाहीत’. असा इशारा राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी दिला होता. इस्त्रायल, अमेरिका आता मोजतबा यांची निवड झाल्यानंतर काय भूमिका घेणार याकडे जगाचे लक्ष लागून राहिले आहे. 

हेही वाचा