२४ तासांत बिनशर्त माफी मागा; अन्यथा कारवाई : सभापतींचा विजयला इशारा

निषेध फलक दाखविल्याप्रकरणी चौघांसह विजयच्या पीएसवर विधानसभा संकुलात बंदी


4 hours ago
२४ तासांत बिनशर्त माफी मागा; अन्यथा कारवाई : सभापतींचा विजयला इशारा

प्रतिनिधी। गोवन वार्ता
अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी प्रश्नोत्तरावेळी चार व्यक्तींनी मीराबाग येथे सुरू असलेल्या आंदोलनाच्या संदर्भात निषेधफलक दाखविले. आपा नाईक, उपेंद्र नाईक, उमेश नाईक आणि हेमंत भंडारी या चौघांना गॅलरीचे पास आमदार विजय सरदेसाई यांच्या शिफारसीवरून देण्यात आले होते. प्रश्नोत्तरावेळी सरदेसाई बोलण्यास उभे राहताच या चौघांनी गॅलरीतून फलक दाखविल्याची घटना घडली. चौकशीत या प्रकारामागे सरदेसाई यांचा सहभाग स्पष्ट झाल्याचे सभापतींनी सांगितले.
पणजी : विधानसभा अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी प्रेक्षक गॅलरीतून निषेधफलक दाखविल्याच्या प्रकाराची गंभीर दखल घेत सभापती गणेश गावकर यांनी आमदार विजय सरदेसाई यांना २४ तासांत सभागृहाची बिनशर्त माफी मागण्याचा आदेश दिला आहे. माफी न मागितल्यास नियमानुसार कारवाई करण्यात येईल, असा इशाराही त्यांनी दिला.
या प्रकरणी गॅलरीतून फलक दाखविणाऱ्या चार जणांसह सरदेसाई यांचे खासगी सचिव हृतिक मांद्रेकर यांना विधानसभा संकुलात प्रवेश करण्यास बंदी घालण्यात आली आहे. हा प्रकार लोकशाहीला घातक असून भविष्यात अशा घटना अजिबात सहन केल्या जाणार नाहीत, अशी कठोर भूमिका सभापतींनी स्पष्ट केली.
मीराबाग–सावर्डे येथे प्रस्तावित बंधारा प्रकल्पाविरोधात आंदोलन सुरू आहे. त्याच पार्श्वभूमीवर विधानसभेच्या गॅलरीतून निषेधफलक दाखविण्याची घटना घडली होती. या प्रकरणाची चौकशी करून कारवाईचे आश्वासन सभापतींनी दिले होते. चौकशी पूर्ण झाल्यानंतर त्यांनी हा आदेश जारी केला. गॅलरीचे पास विजय सरदेसाई यांच्या शिफारसीवर देण्यात आले होते. संबंधित चाैघे सरदेसाई यांच्या कार्यालयात गेल्याचे सीसीटीव्ही फुटेजमधूनही स्पष्ट झाले आहे. घटना घडल्यानंतर या चौघांनी सार्वजनिकरीत्या आनंद व्यक्त केल्याची माहितीही समोर आली आहे.चौकट
या प्रकरणात आणखी एका माजी आमदाराचा सहभाग असल्याचा संशय असून त्याबाबत योग्य ती कारवाई केली जाईल, असेही सभापतींनी स्पष्ट केले. दरम्यान, गॅलरीतून फलक दाखविण्याच्या प्रकाराची चौकशी पर्वरी पोलिसांकडूनही सुरू आहे.
...


कायदेशीर मार्गाने उत्तर देऊ : विजय सरदेसाई
सभापतींनी दिलेल्या आदेशानंतर प्रतिक्रिया देताना विजय सरदेसाई म्हणाले की, माफी मागण्याबाबत २४ तासांची मुदत देण्यात आली आहे. घटनेतील तरतुदी आणि कायदेशीर मार्गांचा अवलंब करून आपण यावर उत्तर देऊ. सभापती आणि सभागृहाबद्दल आपल्याला पूर्ण आदर आहे. गोव्याच्या हितासाठी योग्य ती भूमिका घेत राहू, असे त्यांनी स्पष्ट केले.

मी कोणालाही दहशतवादी म्हटलेले नाही : मुख्यमंत्री
मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी स्पष्ट केले की, मीराबाग आंदोलक किंवा इतर कोणालाही मी दहशतवादी म्हटलेले नाही. आमदार व्हेंझी व्हिएगस यांच्या विधानाला उत्तर देताना ‘दहशतवादी विचारसरणीला खतपाणी घालू नये’ असे आपण म्हटले होते. सभागृह आणि सभापतींचे आदेश सर्वोच्च आहेत. त्यावर मी कोणतीही प्रतिक्रिया देणार नाही, असेही त्यांनी नमूद केले.

हेही वाचा