एक महिना पुरेल इतका राज्यात एलपीजी, इंधनसाठा

विधानसभेत मुख्यमंत्र्यांचे आश्वासक उद् गार


4 hours ago
एक महिना पुरेल इतका राज्यात एलपीजी, इंधनसाठा

प्रतिनिधी। गोवन वार्ता

पणजी : आखाती देशात युद्धाची परिस्थिती सुरू झाल्यावर राज्य सरकारने इंधन पुरवठादार कंपन्यांसोबत बैठक घेतली होती. राज्यात पुढील महिनाभर पुरेल एवढे एलपीजी आणि अन्य इंधनसाठा आहे. याबाबत केंद्र सरकारही राष्ट्रीय पातळीवर एलपीजी सिलिंडरचा तुटवडा भासू नये यासाठी प्रयत्न करत आहे, अशी माहिती मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी सोमवारी विधानसभेत दिली.

मुख्यमंत्र्यांनी सांगितले की, विदेशात काम करणाऱ्या गोमंतकीयांना एनआरआय आयुक्त कार्यालयाकडे नोंदणी करण्याच्या सूचना केल्या आहेत. मात्र अशी नोंदणी सक्तीची नाही. पर्यटक व्हिसावर विदेशात जाऊन तिथे नोकरी करण्याचे प्रकारही घडले आहेत. विदेशात नोकरीच्या बहाण्याने फसवणूक करण्याच्या घटना घडल्या आहेत. आतापर्यंत १८ बनावट एजंटांवर एफआयआर दाखल केली आहे.

विदेशातील गोमंतकीयांसाठी विशेष विभाग स्थापणार

विदेशात काम करणाऱ्या गोमंतकीयांसाठी एनआरआय आयुक्त आणि परराष्ट्र मंत्रालय काम करत आहे. ही दोन्ही कार्यालये आणि राज्य सरकार यांच्यात समन्वय साधण्यासाठी विशेष विभाग सुरू केला जाणार आहे. सध्या सुरू असलेली हेल्पलाईन सेवा २४ तास सुरू केली जाईल, अशी माहिती मुख्यमंत्री डॉ प्रमोद सावंत यांनी दिली. मायकल लोबो आणि उल्हास तुयेकर यांनी उपस्थित केलेल्या लक्षवेधी सूचनेवर ते बोलत होते.              

हेही वाचा