टी-२० विश्वचषक विजेत्या भारतीय संघाला बीसीसीआयकडून १३१ कोटींचे बक्षीस

Story: वेब डेस्क। गोवन वार्ता |
4 hours ago
टी-२० विश्वचषक विजेत्या भारतीय संघाला बीसीसीआयकडून १३१ कोटींचे बक्षीस

नवी दिल्ली : भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (BCCI) टी-२० विश्वचषक जिंकणाऱ्या भारतीय संघाला इतिहासातील सर्वात मोठ्या रोख बक्षिसाची घोषणा केली आहे. अहमदाबाद येथे झालेल्या अंतिम सामन्यात न्यूझीलंडवर शानदार विजय मिळवल्यानंतर सूर्यकुमार यादव (Suryakumar Yadav) यांच्या नेतृत्वाखालील संघाला तब्बल १३१ कोटी रुपयांचे बक्षीस देण्याचा निर्णय बीसीसीआयने घेतला.

बीसीसीआयने प्रसिद्ध केलेल्या निवेदनात म्हटले आहे की, आयसीसी पुरुषांच्या टी-२० विश्वकप २०२६ (ICC Men's T20 World Cup 2026) स्पर्धेत दमदार कामगिरी करून विजेतेपद मिळवल्याबद्दल टीम इंडियाला हा मानाचा सन्मान दिला जात आहे. अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडियम (Narendra Modi Stadium) येथे झालेल्या अंतिम सामन्यात भारताने न्यूझीलंडचा ९६ धावांनी पराभव करत विजेतेपद पटकावले.

या विजयासह भारताने टी-२० विश्वचषक इतिहासात नवा विक्रम नोंदवला. भारत हा सलग दोनदा टी-२० विश्वचषक जिंकणारा पहिला संघ ठरला. तसेच एकूण तीन वेळा विजेतेपद मिळवणारा पहिला संघ बनला. त्यामुळे मर्यादित षटकांच्या क्रिकेटमध्ये भारताचे वर्चस्व अधिक दृढ झाले आहे.

या आधी दोन वर्षांपूर्वी रोहित शर्मा ( Rohit Sharma) यांच्या नेतृत्वाखालील संघाने टी-२० विश्वचषक जिंकल्यानंतर बीसीसीआयने १२५ कोटी रुपयांचे बक्षीस जाहीर केले होते.  त्याआधी आयसीसी चा‌‌म्पियन्स ट्रॉफी विजेत्या भारतीय संघाला ५८ कोटी रुपये तर महिला विश्वचषक विजेत्या संघाला ५१ कोटी रुपयांचे देण्यात आले होते.

अंतिम सामन्यात भारताने प्रथम फलंदाजी करत २० षटकांत ५ गडी गमावून २५५ धावांचा प्रचंड डोंगर उभारला. त्यानंतर न्यूझीलंडचा डाव १५९ धावांत गुंडाळत भारताने ९६ धावांनी दणदणीत विजय मिळवला.

हेही वाचा