निर्यात खर्च पाचपट वाढला

नवी दिल्ली : पश्चिम आशियातील (Western Asia) वाढत्या युद्धस्थितीचा (War) भारताच्या (India) निर्यात व्यापारावर मोठा परिणाम होत आहे. सुमारे ४५ हजार भारतीय कंटेनर जहाजांमध्ये, बंदरांमध्ये आणि वाहतूक मार्गांवर अडकून पडले आहेत. या कंटेनरमध्ये १ ते दीड अब्ज डॉलरच्या निर्यातीचा माल पडून आहे. या परिस्थितीमुळे निर्यातदारांच्या लॉजिस्टिक खर्चात मोठी वाढ झाली आहे. मालवाहतूक दर आणि इतर खर्च ५ पटपर्यंत वाढल्याची माहिती उद्योग क्षेत्रातून देण्यात आली आहे.
कंटेनरमधील (Container) मालाचे नुकसान झाल्यास निर्यातदारांचे कबंरडे मोडले जाणार आहे. अडकलेल्या कंटेरनमध्ये ४ लाख टन बासमती तांदळाचाही समावेश आहे. ८० टक्के कंटेनर हे समुद्री (Sea) मार्गावर अडकले आहेत. हवाई आणि समुद्री अशा दोन्ही मार्गांवर जवळपास एक ते दीड अब्ज डॉलरचा माल अडकून पडला आहे.
पश्चिम आशियातील तणाव वाढल्यामुळे जहाज कंपन्या होर्मुज समुद्रधून (Strait of Hormuz) परिसरातील संवेदनशील मार्ग टाळत आहेत. त्यामुळे अनेक जहाजांचे प्रवास उशिरा होत आहेत. काही जहाजांना पर्यायी मार्गाने वळवण्यात येत आहे, तर काही माल पुन्हा भारतीय बंदरांकडे परत पाठवावा लागत आहे.
या अडथळ्यांमुळे युरोप आणि अमेरिकेसारख्या महत्त्वाच्या बाजारपेठांकडे जाणाऱ्या भारतीय निर्यातीच्या वितरणात विलंब होत असून, निर्यातदारांमध्ये अनिश्चिततेचे वातावरण निर्माण झाले आहे.
उद्योग क्षेत्रातील तज्ज्ञांनी इशारा दिला आहे की, मोठ्या प्रमाणात माल परत आल्यास भारतीय बंदरांमध्ये गर्दी निर्माण होऊ शकते आणि निर्यातीच्या सुरळीत प्रक्रियेवर परिणाम होऊ शकतो.
केंद्र सरकारकडे करणार पाठपुरावा
दरम्यान, निर्यातदार संघटना लवकरच केंद्र सरकारकडे या प्रश्नाबाबत पाठपुरावा करणार असून अडकलेले कंटेनर, वाढलेले मालवाहतूक दर आणि संभाव्य पुरवठा साखळीतील अडथळे दूर करण्यासाठी तातडीची उपाययोजना करण्याची मागणी करण्यात येणार आहे.