
पणजीः महिन्याच्या (Month) पगाराप्रमाणे गृह आधार आणि दयानंद सामाजिक सुरक्षा योजनेचे पैसे आता दर महिन्याच्या १० तारखेला लाभार्थ्यांच्या बॅंक खात्यात (Bank account) येणार असल्याचे मुख्यमंत्री (Chief Minister) डॉ. प्रमोद सावंत यांनी सांगितले.
आजच्या दिवसापर्यंत म्हणजेच १० मार्च पर्यंत गृह आधार आणि दयानंद सामाजिक सुरक्षा योजनेचे ४५.२६ कोटी रुपये हे २.२४ लाखांपेक्षा अधिक लाभार्थ्यांच्या बॅंक खात्यात जमा झाले आहेत. या योजनेचा लाभ घेण्यासाठी दोन महिन्यांच्या आत उत्पन्न आणि जीवन प्रमाणपत्र सादर करणे गरजेचे असल्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी सांगितले.
मुख्यमंत्री डॉ. सावंत यांच्या हस्ते वेळेत आर्थिक सहाय्य देण्याच्या योजनेचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी महिला व बाल विकास मंत्री विश्वजित राणे, समाज कल्याण खात्याचे संचालक दिपक देसाई, महिला आणि बाल विकास खात्याच्या संचालक ज्योती देसाई उपस्थित होते.
यावेळी बोलताना मुख्यमंत्री डॉ. सावंत यांनी सांगितले की, गृह आधार योजनेमार्फत राज्यातील सुमारे २ लाख महिलांना दीड हजार रुपये तर दयानंद सामाजिक सुरक्षा योजनेच्या मार्फत १.३० लाख वृद्धांना दोन हजार रुपये दिले जातात.
जीवन आणि उत्पन्न प्रमाणपत्र यासाठी हे पैसे मागेपुढे होणार. पण यापुढे जसा महिन्याचा पगार सरकारी कर्मचाऱ्यांना १ तारखेला मिळतो. तसेच गृह आधार आणि दयानंद सामाजिक सुरक्षा योजनेचे पेन्शन महिन्याच्या १० तारखेला मिळणार. ११ तारखेला बॅंकेत जाऊन ते पैसे काडता येणार असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.
प्रथम जीवन प्रमाणपत्र कार्यकाळ संपल्यावर द्यावे लागणार. या विषयी मंत्री आणि दोन्ही खात्याच्या संचालकांकडे बोललो आहे. आता प्रत्येक वर्षी उत्पन्न आणि जीवन प्रमाणपत्र गृह आधार मिळवण्यासाठी द्यावे लागणार.
१ एप्रिल ते ३० मे या दोन महिन्यांच्या आत केव्हाही दिले तरी चालते, असे मुख्यमंत्री म्हणाले. तसेच एखाद्या महिलेच्या पतीचे उत्पन्न वाढल्यास उत्पन्न प्रमाणपत्र देणे सक्तीचे आहे. ही दोन्ही प्रमाणपत्रे दोन महिन्यांच्या आत दाखल केल्यास लाभार्थ्यांचे पैसे सुरू राहणार, नाहीतर ते अडकून राहणार असे मुख्यमंत्री म्हणाले.
जर लाभार्थ्यांची काही तक्रार असल्यास त्यांनी समाज कल्याण खात्याचे नोडल अधिकारी रश्मी रावळ यांना ९३२२०६६०७८ या क्रमांकावर आणि महिला आणि बाल विकास खात्याच्या समाज कल्याण अधिकारी कृतिका मांद्रेकर यांना ९२८४२३८५०० या क्रमांकावर संपर्क करावा, असे आवाहन मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी केले.