कर्मचारी भरती : कोंकणीत उत्तीर्ण होणाऱ्या २ हजार उमेदवारांचे प्राथमिक शिक्षण मराठीत

मुख्यमंत्र्यांकडून स्पष्ट : गुणवत्तेच्या आधारेच उमेदवार सरकारी सेवेत


10th March, 11:55 pm
कर्मचारी भरती : कोंकणीत उत्तीर्ण होणाऱ्या २ हजार उमेदवारांचे प्राथमिक शिक्षण मराठीत

प्रतिनिधी। गोवन वार्ता
पणजी : कर्मचारी भरती आयोगामार्फत निवड झालेल्या सुमारे २,५०० उमेदवारांपैकी २००० उमेदवारांचे प्राथमिक शिक्षण मराठी माध्यमातून झाले आहे, अशी माहिती मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी दिली. मराठी माध्यमातून शिक्षण झाले तरी आयोगाच्या परीक्षेतील कोकणी प्रश्नपत्रिका सोडवताना कोणतीही अडचण येत नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले.
मंगळवारी रात्री विधानसभेत अर्थसंकल्पावरील चर्चेला उत्तर देताना मुख्यमंत्री सावंत यांनी ही माहिती दिली. मुख्यमंत्र्यांनी सांगितले की, मी सातव्यांदा सादर केलेला अर्थसंकल्प मूलभूत सुविधा, सामाजिक सुरक्षा, शिक्षण आणि कल्याणावर आधारित ‘जेंडर बजेट’ असून तो ‘विकसित गोवा २०३७’ या दृष्टीकोनावर आधारित आहे. माझे प्राथमिक शिक्षण मराठी माध्यमातून झाले असल्याचे सांगून इच्छुकांनी मराठी माध्यमातून शिक्षण घ्यावे, असे आवाहन त्यांनी केले. कर्मचारी भरती आयोगाद्वारे निवड झालेल्या उमेदवारांमध्ये फोंडा मतदारसंघातील सर्वाधिक ६३ उमेदवार आहेत. माझ्या साखळी मतदारसंघातील उमेदवार सर्वाधिक नाहीत. परीक्षेत मिळालेल्या गुणांनुसारच निवड होते. त्यामुळे गुणवत्तेच्या आधारेच उमेदवार सरकारी सेवेत येत आहेत.
खासगी क्षेत्रातही रोजगाराच्या संधी
गोवा मनुष्यबळ विकास महामंडळामार्फत आतापर्यंत सहा ते सात हजार जणांना नोकऱ्या मिळाल्या आहेत. सरकारी नोकऱ्यांबरोबरच खासगी कंपन्यांमध्येही रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्याचे प्रयत्न सुरू आहेत. महाविद्यालयांमध्ये कॅम्पस मुलाखती घेणे सुरू करण्याची तयारी सुरू असून काही महाविद्यालयांत लवकरच त्याची अंमलबजावणी केली जाणार आहे, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.
जीआयएस मॅपिंगनंतरच रस्त्यांच्या खर्चाला मान्यता
राज्यातील रस्त्यांवरील दुरुस्ती आणि विकास कामांवर नियंत्रण ठेवण्यासाठी जीआयएस मॅपिंग करण्यात येणार आहे. जीआयएस मॅपिंग पूर्ण झाल्यानंतरच संबंधित कामासाठी निधीला मंजुरी दिली जाईल. त्यामुळे एकाच रस्त्यावर वारंवार दुरुस्तीच्या नावाखाली होणारा खर्च टाळता येईल, असे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले.
कल्याणकारी योजनांद्वारे थेट लाभ
राज्यातील दयानंद सामाजिक सुरक्षा योजनेअंतर्गत लाभार्थ्यांची संख्या वाढत आहे. सध्या ५४३ योजनांअंतर्गत लाभार्थ्यांच्या बँक खात्यात थेट लाभ जमा केला जातो. दरमहा सुमारे ५० कोटी रुपये, तर वर्षभरात ५४३ कोटी रुपये थेट लाभार्थ्यांच्या खात्यात जमा होतात, अशी माहिती त्यांनी दिली.
दिवाडी मार्गावर लवकरच रो-रो फेरी सेवा
दिवाडी मार्गावर लवकरच रो-रो फेरी सेवा सुरू होणार आहे. बालरथ योजनेअंतर्गत जुन्या बसच्या जागी नवीन बस आणण्यात येणार आहेत. वालंकिणी येथे ‘यात्री निवास’ उभारण्यासाठी जागेची मागणी करण्यात आली आहे. ‘इंडिया एनर्जी वीक’साठी गोवा आता कायमस्वरूपी स्थळ बनले आहे, असेही त्यांनी सांगितले.
माझ्या डोक्यावर बर्फ, तर तोंडात साखर आहे. मी कोणालाही आतंकवादी म्हटलेले नाही. माझ्या वक्तव्यामुळे कोणाला वाईट वाटले असेल तर मी दिलगिरी व्यक्त करतो.
_ डॉ. प्रमोद सावंत, मुख्यमंत्री