गोव्यात घरगुती गॅस मुबलक प्रमाणात उपलब्ध; टंचाई व्यावसायिक सिलेंडरची!

हॉटेल व्यावसायिकांची कोंडी; पाच सिलिंडर बुक केल्यास एकच पुरवला जातो.

Story: वेब डेस्क । गोवन वार्ता |
12th March, 04:06 pm
गोव्यात घरगुती गॅस मुबलक प्रमाणात उपलब्ध; टंचाई व्यावसायिक सिलेंडरची!

पणजी: गेल्या काही दिवसांपासून संपूर्ण गोवा राज्यात गॅस सिलिंडरच्या तीव्र टंचाईमुळे सर्वसामान्य नागरिक आणि व्यावसायिक हवालदिल झाले आहेत. या गंभीर विषयाचे पडसाद गुरुवारी गोवा विधानसभेच्या अधिवेशनात उमटले. राज्यामध्ये घरगुती गॅस सिलिंडरचा पुरेसा साठा उपलब्ध असून केवळ व्यावसायिक सिलिंडरच्या पुरवठ्यात समस्या निर्माण झाली आहे, पण त्यामुळे जनतेने घाबरून जाण्याची किंवा एजन्सीबाहेर रांगा लावण्याची गरज नाही, असे स्पष्टीकरण मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी सभागृहात दिले.

अधिवेशनाच्या सुरुवातीलाच विरोधी पक्षाने गॅस टंचाईच्या मुद्द्यावरून सरकारला धारेवर धरले. विरोधी पक्षनेते युरी आलेमाव यांनी राज्यातील भयावह परिस्थितीकडे लक्ष वेधले. संपूर्ण गोव्यात गॅससाठी रांगा लागल्या असून लोकांमध्ये भीतीचे वातावरण आहे, लोक पहाटेपासून एजन्सीबाहेर उभे आहेत, असे त्यांनी नमूद केले. तर बाणावलीचे आमदार व्हेंझी व्हिएगस यांनी या समस्येवर उपाय म्हणून सरकारने प्रत्येक घराला मोफत इंडक्शन शेगड्या आणि वीज द्यावी, अशी मागणी केली.

या गदारोळाला उत्तर देताना मुख्यमंत्री म्हणाले की, राज्य सरकार भारत सरकारच्या सतत संपर्कात आहे. केंद्र सरकारने या समस्येचा अभ्यास करण्यासाठी तीन सचिवांची कार्यकारी समिती स्थापन केली आहे. या समितीचा अहवाल प्राप्त होताच व्यावसायिक सिलिंडरची टंचाई दूर केली जाईल. सध्या केवळ व्यावसायिक सिलिंडरचा तुटवडा असल्याने हॉटेल आणि रेस्टॉरंट व्यवसायावर परिणाम झाला आहे, परंतु घरगुती पुरवठा खंडित झालेला नाही. नागरिकांनी अफवांना बळी पडून बुकिंगसाठी विनाकारण गर्दी करू नये, असे आवाहनही त्यांनी केले.

प्रत्यक्षात मात्र राज्यातील चित्र अत्यंत चिंताजनक आहे. पणजी, काणकोण आणि पेडणे यांसारख्या शहरांमध्ये गॅस एजन्सीबाहेर ग्राहकांच्या लांबच लांब रांगा पाहायला मिळत आहेत. सध्या सिलिंडर बुकिंग केवळ 'ओटीपी' आधारित पद्धतीने सुरू असल्याने अनेक ग्राहकांची गैरसोय होत आहे. विशेषतः किनारी भागातील रेस्टॉरंटना मोठा फटका बसला असून, अनेक हॉटेल्सनी आपल्या मेनूमधील खाद्यपदार्थांची संख्या कमी केली आहे. पेडणे येथील काही हॉटेल्समध्ये तर ग्राहकांना पिण्यासाठी गरम पाणी देणेही कठीण झाले आहे.

या टंचाईचा सर्वाधिक फटका व्यावसायिक क्षेत्राला बसत असल्याचे एका धक्कादायक माहितीवरून समोर आले आहे. ज्या हॉटेल चालकांनी पाच सिलिंडर बुक केले आहेत, त्यांना केवळ एकाच सिलिंडरचा पुरवठा केला जात आहे. पुरवठा साखळीतील विस्कळीतपणामुळे गॅस एजन्सीला हा निर्णय घ्यावा लागत असल्याचे वाहतूक करणाऱ्या चालकांनी सांगितले. जागतिक स्तरावर सुरू असलेल्या युद्धाचा परिणाम गॅस पुरवठ्यावर झाल्याची चर्चा सर्वत्र सुरू आहे. दरम्यान, घरोघरी सिलिंडर पोहोचवणाऱ्या गाड्या वेळेवर येत नसल्याने गृहिणींमध्ये तीव्र नाराजी पसरली आहे. सरकार आता केंद्राच्या समितीच्या अहवालाकडे लक्ष लावून असून, ही समस्या कधी सुटते याकडे सर्वांचे डोळे लागले आहेत.

हेही वाचा