सुमारे ६.२७ कोटी रुपयांच्या ३ स्थावर मालमत्ता तात्पुरत्या जप्त. जमीन घोटाळ्यातील जप्तीचा आकडा ७८.१४ पोहोचला कोटी रुपयांवर.

पणजी: गोव्यातील बहुचर्चित जमीन बळकावण्याच्या प्रकरणांमध्ये सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) आपली कारवाई अधिक तीव्र केली असून, अर्जुन पुरस्कार विजेत्या डॉ. ओटिलिया मास्करेन्हास यांच्या पूर्वजांची जमीन हडपल्याप्रकरणी मोठी कारवाई केली आहे. ईडीच्या पणजी विभागीय कार्यालयाने या घोटाळ्यातील मुख्य संशयित ईस्टीवन डिसोझा आणि त्याच्या साथीदारांच्या ६.२७ कोटी रुपये बाजारमूल्य असलेल्या तीन स्थावर मालमत्तांवर तात्पुरती टाच आणली आहे. या ताज्या कारवाईमुळे या जमीन घोटाळ्यातील आतापर्यंतच्या जप्तीचा एकूण आकडा तब्बल ७८.१४ कोटी रुपयांवर पोहोचला आहे.
मनी लाँडरिंग प्रतिबंधक कायद्यांतर्गत करण्यात आलेली ही कारवाई गोव्यातील भू-माफियांच्या मुसक्या आवळण्याच्या दिशेने एक महत्त्वाचे पाऊल मानले जात आहे. या प्रकरणाची पाळेमुळे गोवा पोलिसांनी पर्वरी पोलीस स्थानक आणि आर्थिक गुन्हे शाखेत दाखल केलेल्या गुन्ह्यांमध्ये आहेत. ईस्टीवन डिसोझा, मोझेस फर्नांडिस आणि जमीन घोटाळ्यातील अन्य संशयित मोहम्मद सुहेल यांनी प्लान आखून गोव्यातील अनेक जमिनींचे व्यवहार बेकायदेशीरपणे केले. त्यांनी मूळ जमीन मालकांची बनावट ओळखपत्रे तयार केली आणि बनावट विक्री करार तसेच बनावट पॉवर ऑफ अॅटर्नीच्या साहाय्याने या जमिनी स्वतःच्या किंवा नातेवाईकांच्या नावावर करून घेतल्या.
आरोपींनी केवळ जमिनी हडपल्या नाहीत, तर या बेकायदेशीर मालमत्तांच्या आधारे अनेक खरेदीदारांची फसवणूक करून त्यांच्याकडून मोठी रक्कम उकळल्याचेही ईडीच्या तपासात निष्पन्न झाले आहे. यापूर्वी ईडीने या प्रकरणात ११.८२ कोटी आणि ६०.०५ कोटी रुपयांच्या मालमत्ता संबंधित प्राधिकरणाने कायम जप्त केली. ताज्या तपासानुसार, आरोपींनी आणखी तीन मालमत्ता आपल्या कुटुंबातील सदस्यांच्या नावे वळवण्यासाठी बनावट कागदपत्रांचा वापर केला होता. या मालमत्ता 'गुन्ह्यातून मिळालेले उत्पन्न' (Proceeds of Crime) असल्याचे स्पष्ट झाल्यामुळे ईडीने त्या तात्पुरत्या जप्त केल्या आहेत.
सध्या या संपूर्ण प्रकरणाचा खटला गोव्यातील विशेष पीएमएलए न्यायालयात सुरू असून, ईडीने यापूर्वीच आरोपींविरुद्ध दोषारोपपत्र दाखल केले आहे. न्यायालयाने या प्रकरणाची दखल घेतली असून ट्रायल प्रक्रिया अंतिम टप्प्यात आहे. या रॅकेटमध्ये अजून काही जणांचा सहभाग असण्याची शक्यता वर्तवण्यात येत असून, ईडी त्यादृष्टीने अधिक तपास करत आहे.