साठवणूक केल्याने तात्पुरती समस्या

पणजी : गोव्यात (Goa) घरगुती तसेच व्यावसायिक गॅस सिलिंडरचा (Gas Cylinder) पुरवठा सुरळीत सुरू असून; गॅसचा पुरेसा साठा उपलब्ध आहे, अशी माहिती नागरी पुरवठा खात्याच्या (Civil Supply Department) वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली. काही नागरिकांनी भीती पोटी मोठ्या प्रमाणात सिलिंडर साठवण्यास सुरूवात केल्यामुळेच तात्पुरती टंचाई निर्माण झाल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
अधिकाऱ्यांनी सांगितले की, राज्यात गॅसचा पुरेसा साठा असून गॅस डिलर्सना दररोज एक ते दोन ट्रक सिलिंडर पुरवले जात आहेत. मात्र; नागरिकांनी घाबरून सिलिंडर घेण्यासाठी गर्दी केल्यामुळे काही ठिकाणी अडचणी निर्माण झाल्या.
व्यावसायिक सिलिंडरचा पुरवठाही आजपासून पुन्हा सुरू करण्यात आला आहे. सध्या व्यावसायिक वापरासाठी एकूण कोट्यातील २० टक्के सिलिंडर वितरित करण्यात येत असून; हा कोटा हळूहळू वाढवला जाणार आहे. घरगुती तसेच व्यावसायिक दोन्ही प्रकारचे सिलिंडर राज्यभर उपलब्ध असून त्यासाठी घरपोच सेवाही पुन्हा सुरू करण्यात आल्याची माहिती देण्यात आली.
गॅसचा पुरवठा प्रामुख्याने एचपीसीएल–कुंडई, बीपीसीएल–वेर्णा आणि आयओसीएल–बेळगाव या तीन एजन्सींमार्फत राज्यातील डिलर्सना केला जात आहे. या तिन्ही एजन्सींकडेही पुरेसा गॅस साठा उपलब्ध असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. तसेच रिकामे सिलिंडर भरून पुन्हा बाजारात पाठवण्याचे कामही डिलर्सकडून सुरू आहे.
दरम्यान, अलीकडे निर्माण झालेल्या परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर राज्यातील सिलिंडर व्यवहारावर लक्ष ठेवण्यासाठी नागरी पुरवठा खात्याने सर्व डिलर्सच्या कार्यालयांमध्ये एक अधिकारी नियुक्त केला आहे. त्यामुळे पुरवठा व वितरणावर अधिक प्रभावी नियंत्रण ठेवता येणार असल्याचेही अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.