निवडणूक आयोगाची आज दिल्लीत महत्त्वाची पत्रकार परिषद

नवी दिल्ली/पणजी: देशातील राजकीय वातावरण तापवणारी मोठी बातमी समोर येत असून, आज संध्याकाळी ४ वाजता निवडणूक आयोग एका महत्त्वपूर्ण पत्रकार परिषदेत चार राज्यांच्या विधानसभा निवडणुकांचे वेळापत्रक जाहीर करणार आहे. यामध्ये पश्चिम बंगाल, तामिळनाडू, केरळ, आसाम ही राज्ये आणि पुद्दुचेरी या केंद्रशासित प्रदेशाचा समावेश आहे. यांचा विधानसभांचा कार्यकाळ मे महिन्यात संपत असल्याने, तत्पूर्वी निवडणुकांचे निकाल जाहीर होणे आवश्यक आहे.
या घोषणेसोबतच संपूर्ण देशात आणि विशेषतः संबंधित राज्यांमध्ये आचारसंहिता लागू होणार आहे. तसेच गोव्याचे तत्कालीन कृषिमंत्री रवी नाईक यांच्या निधनानंतर रिक्त झालेल्या फोंडा विधानसभा मतदारसंघाच्या जागेवर पोटनिवडणूकीबाबत देखील घोषणा होऊ शकते.
निवडणूक आयोगाच्या नुकत्याच पार पडलेल्या 'एसआयआर' प्रक्रियेनंतर या पाच राज्यांच्या मतदार यादीत मोठी घट झाली आहे. यामध्ये तामिळनाडूत सर्वाधिक ७४.०७ लाख मतदारांची नावे वगळण्यात आली असून, आता तिथे ५.६७ कोटी मतदार नोंदणीकृत आहेत. पश्चिम बंगाल दुसऱ्या क्रमांकावर असून तिथे ५८ लाख नावे कमी झाली आहेत. केरळमध्ये ८ लाख, आसाममध्ये २ लाख आणि पुद्दुचेरीमध्ये ७७ हजार मतदारांची नावे वगळण्यात आली आहेत. यामुळे आगामी निवडणुकांचे राजकीय समीकरण बदलण्याची शक्यता आहे.
पश्चिम बंगालमध्ये मुख्यमंत्री ममता बॅनर्जी सलग चौथ्यांदा सत्ता स्थापन करून नवा विक्रम प्रस्थापित करण्यासाठी प्रयत्नशील आहेत, तर भाजपने तिथे कडवे आव्हान उभे केले आहे. आसाममध्ये भाजप आपली सत्ता राखण्यासाठी, तर तामिळनाडूमध्ये प्रादेशिक पक्षांच्या वर्चस्वात स्थान निर्माण करण्यासाठी धडपडत आहे. केरळमध्ये डाव्या आघाडीचे सरकार आपली खुर्ची टिकवण्याचा प्रयत्न करणार असून, तिथे काँग्रेस आणि भाजपची ताकद पणाला लागणार आहे. पुद्दुचेरीमध्ये सत्ताधारी युती आणि काँग्रेस-डीएमके युतीमध्ये थेट सामना होण्याची शक्यता आहे. यावेळच्या निवडणुकीत मतदार याद्यांच्या पुनर्रक्षणानंतर (एसआयआर प्रक्रिया) तामिळनाडू आणि बंगालमधून लाखो मतदारांची नावे वगळण्यात आल्याची माहिती समोर आली आहे, ज्यामुळे राजकीय गणिते बदलू शकतात.
या राष्ट्रीय निवडणुकांसोबतच गोव्याच्या राजकारणाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाची असलेली फोंडा विधानसभा मतदारसंघाची पोटनिवडणूकही आज जाहीर होण्याची दाट शक्यता आहे. गोव्याचे तत्कालीन कृषिमंत्री रवी नाईक यांच्या निधनामुळे ही जागा रिक्त झाली आहे. निवडणूक आयोग आज या पोटनिवडणुकीची तारीखही निश्चित करू शकतो. या जागेसाठी भाजपने आपल्या दोन प्रमुख इच्छुकांची नावे पक्षश्रेष्ठींकडे पाठवली असून, काँग्रेस आणि इतर विरोधकही ही जागा खेचून आणण्यासाठी सज्ज झाले आहेत. फोंड्याचा गड राखण्यासाठी भाजप सर्वस्व पणाला लावणार आहे.