
पणजी : गोव्यातील फोंडा विधानसभा मतदारसंघासाठी पोटनिवडणूक जाहीर करण्यात आली आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाने आज दिल्लीत पत्रकार परिषद घेऊन या निवडणुकीचे वेळापत्रक घोषित केले. त्यानुसार फोंडा मतदारसंघासाठी ९ एप्रिल २०२६ रोजी मतदान होणार असून ४ मे २०२६ रोजी मतमोजणी करण्यात येईल. फोंड्याचे आमदार रवी नाईक यांचे १५ ऑक्टोबर २०२५ रोजी निधन झाल्यानंतर ही जागा रिक्त झाली होती. त्यानंतर आता या मतदारसंघासाठी पोटनिवडणूक घेण्याचा निर्णय आयोगाने जाहीर केला आहे.
निवडणुकीचे वेळापत्रक जाहीर होताच फोंडा मतदारसंघात आचारसंहिता तात्काळ लागू झाली आहे. त्यामुळे प्रशासन आणि राजकीय पक्षांची निवडणुकीची तयारीही आता वेग घेणार आहे. दरम्यान, १६ मार्च रोजी अधिसूचना निघेल तर २३ मार्च पर्यंत अर्ज भरता येतील. उमेदवारांचे नामनिर्देशन अर्ज स्वीकारण्याची प्रक्रिया अधिसूचनेनंतर सुरू होणार आहे. फोंडा हा गोव्यातील महत्त्वाचा आणि राजकीयदृष्ट्या प्रभावी मतदारसंघ मानला जातो. त्यामुळे या पोटनिवडणुकीकडे राज्यातील प्रमुख राजकीय पक्षांचे लक्ष लागले असून निवडणूक चुरशीची होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. या पोटनिवडणुकीचा निकाल ४ मे रोजी मतमोजणीनंतर जाहीर होणार असून त्यातून फोंडा मतदारसंघाला नवा आमदार मिळणार आहे. दक्षिण गोव्यात आचारसंहिता लागू होणार आहे.
४,२३० मतदार घटल्याने समीकरणे बदलणार
मागील विधानसभा निवडणुकांच्या तुलनेत एसआयआर नंतर फोंडा मतदारसंघातील मतदारांचा आकडा ४,२३० मतांनी कमी झाल्याने समीकरणे पूर्णत: बदलणार आहेत. मतदारांचा आकडा ४ हजारांहून अधिक प्रमाणात कमी झाल्याने राजकीय पक्षांनाही रणनितीत बदल करावा लागणार आहे. मागील म्हणजेच २०२२च्या निवडणुकीत फोंडा मतदारसंघात ३२,१५७ मतदार होते. एसआयआरनंतर हा आकडा २७,९२७वर आला आहे. मतदारांचा आकडा कमी झाल्याने याचा लाभ नेमका कोणाला होईल? यावर बरेच काही अवलंबून आहे.
फोंडा पोटनिवडणुकीचे सविस्तर वेळापत्रक
* पोटनिवडणुकीची अधिसूचना : १६ मार्च २०२६ (सोमवार)
* उमेदवारी अर्ज भरण्याची शेवटची तारीख: २३ मार्च २०२६ (सोमवार)
* उमेदवारी अर्जांची छाननी : २४ मार्च २०२६ (मंगळवार)
* उमेदवारी अर्ज मागे घेण्याची तारीख : २६ मार्च २०२६ (गुरूवार)
* मतदानाची तारीख : ९ एप्रिल २०२६ (गुरूवार)
* मतमोजणीची तारीख : ४ मे २०२६ (सोमवार)
फोंडा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीची तयारी सुरू आहे. लवकरच पक्षश्रेष्ठी काँग्रेसच्या उमेदवाराचे नाव जाहीर करतील.
अमित पाटकर, प्रदेश काँग्रेस अध्यक्ष
फोंडा मतदारसंघाचा प्रचार जोरात सुरू आहे. निवडणूक जाहीर झाली आहे त्यामुळे केंद्रीय संसदीय मंडळ उमेदवार जाहीर करेल.
दामू नाईक, प्रदेश भाजप अध्यक्ष