अमेरिकेत ‘यू-व्हिसा’ मिळवण्यासाठी घातले बनावट दरोडे; ११ भारतीयांना अटक

Story: वेब डेस्क। गोवन वार्ता |
16th March, 02:59 pm
अमेरिकेत ‘यू-व्हिसा’ मिळवण्यासाठी घातले बनावट दरोडे; ११ भारतीयांना अटक

नवी दिल्ली : अमेरिकेत (USA) स्थलांतराशी संबंधित लाभ मिळवण्यासाठी बनावट सशस्त्र दरोड्यांचे (Dacoity) नाट्य रचल्याच्या आरोपावरून ११ भारतीय नागरिकांना (Indian Citizens) अटक (Arrest) करण्यात आली आहे. या प्रकरणात त्यांच्यावर व्हिसा (Visa) फसवणुकीच्या कटाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ‘यू-व्हिसा’ मिळवण्यासाठी हे बनावट सशस्त्र दरोडे टाकण्यात आले. 

मॅसेच्युसेट्समधील बॉस्टन येथील फेडरल तपास अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, संशयितांनी विविध दुकाने आणि व्यावसायिक आस्थापनांमध्ये बनावट दरोड्यांचे प्रकार घडवून आणले. त्या ठिकाणी काम करणाऱ्या व्यक्तींना गुन्ह्याचे “बळी” असल्याचे दाखवून अमेरिकेचा विशेष ‘यू-व्हिसा’ मिळवण्याचा प्रयत्न करण्यात आला.

अमेरिकेत गंभीर गुन्ह्यांचे बळी ठरलेल्या आणि तपास यंत्रणांना सहकार्य करणाऱ्या व्यक्तींना ‘यू-व्हिसा’ देण्याची तरतूद आहे. याच तरतुदीचा गैरफायदा घेण्यासाठी संशयितांनी हा कट रचल्याचा आरोप आहे.

तपास यंत्रणांच्या माहितीनुसार, संशयितांनी किमान सहा वेळा सोयीस्कर दुकाने, मद्यविक्री दुकाने आणि फास्ट-फूड रेस्टॉरंटमध्ये बनावट दरोडे घडवले. या नाट्यात एक व्यक्ती बनावट दरोडेखोराची भूमिका करत दुकानात शिरत असे.  हातात बंदुकीसारखी दिसणारी वस्तू घेऊन तो कॅश काउंटरमधील पैसे घेऊन पळून जात असे.

संपूर्ण घटना खरी वाटावी म्हणून दुकानातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांमध्ये ती नोंद होईल; याची खबरदारी घेतली जात होती. दरोड्यानंतर दुकानातील लोक त्वरित पोलिसांना कळवत नसत, तर सुमारे पाच मिनिटे किंवा त्याहून अधिक वेळ थांबत असत, जेणेकरून बनावट दरोडेखोर सहज पळून जाईल आणि घटना खरी असल्याचा भास निर्माण होईल.

या कटात सहभागी होण्यासाठी काही व्यक्तींनी पैसे दिल्याचेही तपासात उघड झाले आहे. या रकमेचा काही भाग आयोजकांकडे जात असे, तर काही पैसे दुकान मालकांना देऊन त्यांच्या आस्थापनांत हे बनावट दरोडे घडवले जात होते.

या प्रकरणात जितेंद्रकुमार पटेल, महेशकुमार पटेल, संजयकुमार पटेल, अमिताबेहेन पटेल, संगीता पटेल आणि मितुल पटेल यांना मॅसेच्युसेट्समध्ये अटक करण्यात आली. त्यानंतर त्यांना बॉस्टन फेडरल न्यायालयात हजर करण्यात आले. तर रमेशभाई पटेल, रोनककुमार पटेल, सोनल पटेल आणि मिंकेश पटेल यांना केंटकी, मिसुरी आणि ओहायो राज्यांत अटक करण्यात आली आहे. त्यांनाही पुढील सुनावणीसाठी बॉस्टन फेडरल न्यायालयात हजर केले जाणार आहे.

अमेरिकेच्या कायद्यानुसार व्हिसा फसवणुकीचा कट सिद्ध झाल्यास संशयितांना पाच वर्षांपर्यंत कारावास, तीन वर्षे देखरेख आणि २.५ लाख डॉलरपर्यंत दंडाची शिक्षा होऊ शकते.

ही कारवाई अमेरिकेची तपास संस्था एफबीआय, इमिग्रेशन विभाग आणि विविध राज्यांतील कायदा अंमलबजावणी संस्थांच्या संयुक्त कारवाईतून करण्यात आली आहे. दरम्यान, अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले की सध्या हे आरोप असून; न्यायालयीन प्रक्रियेनंतरच अंतिम निकाल लागणार आहे.



हेही वाचा