विधिमंडळ कामकाजाविषयी ज्ञान नाही : आमदार सरदेसाई

पणजी : काँग्रेस (Congress), आप (Aap), आरजी (RGP) व गोवा फॉरवर्ड (Goa Forward Party) या विरोधी आमदारांमध्ये फूट पडल्याचे आज अधिवेशन तहकूब केल्यानंतर सिद्ध झाले. सरकारशी (Government) सेटिंग करणारे काही कमांडर आहेत असा आरोप विरोधी पक्ष नेते युरी आलेमाव यांनी केला. आमच्या ६ जणांसोबत विजय सरदेसाई आमच्या बरोबर नाहीत. याचाच अर्थ कोणी सेटिंग केले ते स्पष्ट होते, असे आमदार विरेश बोरकर म्हणाले.
फोंडा पोटनिवडणूक आचारसंहितेमुळे आज विनियोग विधेयक संमत करून अधिवेशनाचा समारोप करण्यात आला. याला विजय सरदेसाई सोडून इतर विरोधी आमदारांनी पत्रकारांशी बोलताना हरकत घेतली. यापूर्वी पोटनिवडणूक असताना अधिवेशने झालेली आहेत. सभागृह सर्वोच्च असल्याने अधिवेशन सूरू राहण्यास कोणतीच हरकत नव्हती. विनियोग विधेयक चर्चेविना संमत होणे ही लोकशाहीची हत्या आहे. सरकार बरोबर सेटिंग करणाऱ्या काही कमांडरांचा यात हात आहे, असा आरोप युरी आलेमाव यांनी केला.
विविध प्रश्न तसेच समस्यांवर चर्चा करण्यासाठी अधिवेशन सूरू राहण्याची आवश्यकता होती. आम्ही खासगी विधेयकाचा मुद्दा मांडला असताना एकाने आचारसंहितेचा मुद्दा मांडला. ६ विरोधी आमदारांसोबत आमच्यामध्ये विजय सरदेसाई नाहीत. यामुळे कोण फिक्सिग मध्ये आहे ते स्पष्ट होते, असे विरेश बोरकर म्हणाले.
लेखानुदान घेण्याची मागणी का केली नाही : आमदार सरदेसाई
इतर ६ जणांना विधिमंडळ कामकाजाविषयी ज्ञान नसल्याने ते असे आरोप करीत आहेत. विधिमंडळ कामकाजाचे ज्ञान असते तर त्यानी लेखानुदान घेण्याची मागणी केली असती. कार्लुस फेरेरा हे ज्येष्ठ वकील असतानाही त्यानी हा मुद्दा उपस्थित केला नाही. भोजन काळानंतर विरोधी आमदारांमध्ये सभागृहात कोणती भूमिका घ्यावी याबाबत एकत्रितपणे कोणताही निर्णय झाला नव्हता असे गोवा फॉरवर्ड पक्षाचे आमदार विजय सरदेसाई यांनी सांगितले.