१५ पैकी केवळ २ खासगी प्रश्नांवर झाली चर्चा

पणजी : पोटनिवडणुकीच्या (By-election) आचारसंहितेमुळे सोमवारी अर्थसंकल्पीय अधिवेशन (Budget session) आटोपते घेतल्याची घोषणा सभापती (Speaker) गणेश गावकर यांनी केली. आणि विरोधी आमदार तसेच जनतेची काही प्रमाणात निराशा झाली.
६ ते २७ एप्रिल पर्यंत १४ दिवसांच्या कामकाजाचे हे अधिवेशन होते. सात दिवस चाललेल्या या अधिवेशनात आमदारांनी विचारलेले ४५ टक्के प्रश्न सभागृहाच्या पटलावर आले. म्हणजेच तारांकीत आणि अतरांकीत मिळून ४५ टक्के प्रश्नांची लेखी उत्तरे आमदारांना मिळाली. तारांकीत आणि अतारांकीत मिळून आमदारांचे २९३१ प्रश्न आले होते. त्यातील १३५२ प्रश्नांची उत्तरे मिळाली. त्यात तारांकीत आणि अतारांकीत प्रश्नांचा समावेश होता.
म्हणजे आमदारांनी विचारलेल्या बहुतेक प्रश्नांची (५५ टक्के) उत्तरे आमदारांना मिळाली नाहीत. तारांकीत प्रश्नांवर सभागृहात चर्चा होते. शेवटच्या दिवशी म्हणजेच १६ मार्चला प्रश्नोत्तरांच्या वेळी कामकाज तहकूब केल्याने एकाही प्रश्नावर चर्चा झाली नाही. तसेच शुक्रवारी ही प्रश्नोत्तराच्या वेळी कामकाज तहकूब केल्याने सभागृहाचा बराच वेळ वाया गेला.
अधिवेशनासाठी आमदारांकडून ५८३ तारांकीत तर २३४८ अतारांकीत मिळून २९३१ प्रश्न आले होते. त्यातील २५३ तारांकीत आणि १३३२ अतारांकीत मिळून १३५२ प्रश्नांची उत्तरे सभागृहाच्या पटलावर मिळाली.
७ दिवसांच्या कामकाजात ८ लक्षवेधी सूचनांवर चर्चा होऊन मंत्र्यांनी उत्तरे दिली. अधिवेशनसाठी आमदारांकडून १५ खासगी प्रस्ताव दाखल झाले. त्यातील केवळ २ खासगी प्रस्ताव चर्चेला आले. शुक्रवारी (१३ मार्च) कामकाजाच्या वेळी २ खासगी प्रस्ताव पुढे ढकळण्यात आले होते. मात्र, ते चर्चेला आले नाहीत. सरकारी विधेयकाचा विचार केल्यास एक ही विधेयक सादर झाले नाही. १६ मार्चच्या कामकाजात नगरपालिका दुरूस्ती विधेयकाचा समावेश अजेंड्यात होता. मात्र, त्याच्या पूर्वीच कामकाज तहकूब झाले.