हिमाचल-जम्मू काश्मीरमध्ये बर्फवृष्टी

नवी दिल्ली (New Delhi) : देशातील विविध भागांमध्ये गेल्या तीन दिवसांपासून वादळी वारे, मुसळधार पाऊस (Heavy Rain) आणि गारपीट यांचा तडाखा कायम आहे. भारतीय हवामान विभागाने (IMD) दिलेल्या माहितीनुसार १८ मार्चपासून तीव्र पश्चिमी विक्षोभ सक्रिय झाल्यामुळे हवामानात मोठे बदल झाले आहेत.
ईशान्येकडील मेघालय (Meghalaya) राज्यातही खराब हवामानाचा मोठा फटका बसला आहे. रीभोई जिल्ह्यात जोरदार वादळ आणि पावसामुळे तब्बल १०२८ घरांचे नुकसान झाले आहे. सुमारे ५ हजार नागरिक प्रभावित झाले आहेत. उमलिंग आणि जिरांग ब्लॉकमधील गावांना सर्वाधिक फटका बसल्याची माहिती प्रशासनाने दिली आहे.
पंजाब (Punjab), दिल्ली, चंदीगड, हरियाणा (Haryana) आणि उत्तर प्रदेश (Uttar Pradesh) वगळता उर्वरित देशभरात आज वादळी पावसाचा ‘यलो अलर्ट’ जारी करण्यात आला आहे. तसेच छत्तीसगड आणि महाराष्ट्रातील विदर्भ भागात मुसळधार पावसाचा ‘ऑरेंज अलर्ट’ देण्यात आला आहे. काही ठिकाणी गारपीट होण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे.
दरम्यान, जम्मू-कश्मीर, लडाख आणि हिमाचल प्रदेशातील उंच भागांमध्ये मंगळवारीही बर्फवृष्टी सुरूच होती. कठुआ जिल्ह्यातील सरथल, तसेच हिमाचलमधील कुल्लू आणि लाहौल-स्पीती परिसरात मोठ्या प्रमाणात हिमवर्षाव झाला.