कोट्यवधींचे खंडणीप्रकरण‌ : अंडरवर्ल्ड डॉन रवी पुजारी ठाणे पोलिसांच्या कोठडीत

२०१७च्या खंडणी प्रकरणात चौकशीला वेग : २७ मार्चपर्यंत पोलीस कोठडी

Story: वेब डेस्क। गोवन वार्ता |
19th March, 02:06 pm
कोट्यवधींचे खंडणीप्रकरण‌ : अंडरवर्ल्ड डॉन रवी पुजारी ठाणे पोलिसांच्या कोठडीत

ठाणे : महाराष्ट्रातील (Maharashtra)  ठाणे पोलिसांच्या खंडणी विरोधी पथकाने (Anti-Extortion cell)  अंडरवर्ल्ड डॉन (underworld gangster)  रवी पुजारी (५७) (Ravi Pujari)  याला २०१७ मधील खंडणी प्रकरणात चौकशीसाठी बेंगळुरू कारागृहातून ताब्यात घेतले आहे. बुधवारी त्याला विशेष मोक्का न्यायालयात हजर करण्यात आले असता;  न्यायालयाने २७ मार्चपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.

रवीप्रकाश सुलैय्या पुजारी हा कर्नाटकातील उडपीचा रहिवासी असून, तो अनेक वर्षांपासून आंतरराष्ट्रीय स्तरावर कार्यरत फरार गुन्हेगार म्हणून ओळखला जात आहे.  व्यावसायिक आणि राजकीय व्यक्तींना धमकावून खंडणी उकळण्याच्या रॅकेटशी त्याचा संबंध असल्याचा आरोप आहे. परदेशातून कारभार चालवत असल्यामुळे त्याच्याविरोधात इंटरपोलमार्फत रेड कॉर्नर नोटीसही जारी करण्यात आली होती.

२०१९ मध्ये सेनेगलमध्ये अटक झाल्यानंतर त्याला भारतात आणण्यात आले होते. त्यानंतर बेंगळुरू कारागृहात ठेवण्यात आले होते.  देशभरातील विविध यंत्रणा त्याच्याविरोधातील प्रकरणांचा तपास करत आहेत.

ठाणे पोलिसांच्या माहितीनुसार, शहरात नोंद असलेल्या किमान सहा खंडणी प्रकरणांमध्ये पुजारी ‘वाँटेड’ आहे. त्याच्या टोळीने रिअल इस्टेट व्यावसायिक, उद्योजक आणि राजकीय नेत्यांना धमक्या देऊन मोठ्या रकमेची मागणी केल्याचा आरोप आहे. त्यावेळी धमक्या मिळालेल्या काही नगरसेवकांनी पुढे राज्य सरकारमध्ये वरिष्ठ मंत्रीपदही भूषवले आहे.

व्यावसायिकाकडे मागितली ३ कोटींची खंडणी 

सध्या ज्या प्रकरणात त्याला ठाण्यात आणण्यात आले आहे, ते २०१७ मधील आहे. एका बांधकाम व्यावसायिकाकडून तब्बल ३ कोटी रुपयांची खंडणी मागण्यात आली होती. पैसे देण्यास नकार दिल्यानंतर त्याच्या कार्यालयाबाहेर गोळीबार करून दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न करण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले. या प्रकरणात दोन आरोपींना तत्काळ अटक झाली होती.  मात्र; पुजारी परदेशात असल्यामुळे तो पोलिसांना सापडू शकला नव्हता. 

या प्रकरणी भारतीय दंड संहितेच्या कलम ३८५, ३८७, १२०(ब), ३४ तसेच महाराष्ट्र संघटीत गुन्हे नियंत्रण कायदा (MCOCA) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सहा खंडणी प्रकरणांत करणार चौकशी 

तपास अधिकारी एसीपी विनय घोरपडे यांनी सांगितले की, “ठाण्यातील सहा खंडणी प्रकरणांमध्ये त्याची चौकशी केली जाणार आहे. सध्या तो आमच्या ताब्यात असल्याने उर्वरित प्रकरणांबाबतही एकाचवेळी सखोल चौकशी केली जाईल.”

हेही वाचा