डेल्टीन कॅसिनोची कंपनी डेल्टा कॉर्पला १,७५२.४ कोटींची जीएसटी वसुली नोटीस

देशातील तीन कंपन्यांना २,२०० कोटींपेक्षा जास्त जीएसटी वसुलीसाठी नोटीस

Story: वेब डेस्क। गोवन वार्ता |
20th March, 04:04 pm
डेल्टीन कॅसिनोची कंपनी डेल्टा कॉर्पला १,७५२.४ कोटींची जीएसटी वसुली नोटीस

मुंबई : देशातील तीन प्रमुख कंपन्यांना मिळून २,२०० कोटींपेक्षा जास्त जीएसटी वसुलीसाठी नोटीस पाठवण्यात आली आहे.  डेल्टीन कॅसिनोची कंपनी डेल्टा कॉर्पला १,७५२.४ कोटींची जीएसटी वसुलीची नोटीस बजावली आहे. कर कमी भरल्याच्या कारणाकरून ही नोटीस बजावली आहे. डेल्टाची उपकंपनी हायस्ट्रीट क्रूझेस अँड एंटरटेनमेंटचाही यात समावेश आहे. फिजिक्सवाला लिमिटेडला आयकर कायद्याच्या कलम १४३(३) अंतर्गत मूल्यांकन २६३.३४ कोटींची कर वसुली नोटीस पाठवण्यात आली आहे. 

देशातील या तीन प्रमुख कंपन्यांना मिळून २,२०० कोटींपेक्षा जास्त जीएसटी कर वसुलीची नोटीस पाठवल्याने कॉर्पोरेट क्षेत्रात खळबळ माजली आहे.  डेल्टा कॉर्प लिमिटेड (Delta Corp Limited), तामीळनाड मर्कंटाईल बॅंक (Tamilnad Mercantile Bank) आणि फिजिक्सवाला लिमिटेड  (Physicswallah Limited)  या कंपन्यांना वेगवेगळ्या कारणांवरून आयकर व जीएसटी विभागाकडून या मोठ्या रकमेच्या नोटिसा पाठवण्यात आल्या आहेत.

डेल्टा कॉर्प लिमिटेडला आर्थ‌िक वर्ष २०२३-२३ साठी १,७५२.४ कोटी रुपयांच्या जीएसटी थकबाकीबाबत नोटीस मिळाली आहे. ही नोटीस कंपनीसह उपकंपनी हायस्ट्रीट क्रुझीस आणि एंटरटेनमेंट प्रा. लि. यांनाही देण्यात आली आहे.  ‘‘ग्रॉस बेट व्हॅल्यू”वर आधारित कर आकारणी केल्याचा दावा करण्यात आला आहे. कंपनीने मात्र ही मनमानी व कायद्याच्या विरोधात असल्याचे सांगत न्यायालयीन लढा देण्याचा निर्णय घेतला आहे. यापूर्वी जुलै २०१७ ते मार्च २०२२ च्या कालावधीतील अशाच नोटिसींना सर्वोच्च न्यायालयाने स्थगिती दिली आहे.

दरम्यान, तामीळनाड मर्कंटाईल बॅंकेला मूल्यांकन वर्ष २०१३-१४ साठी २०४.२३ कोटींची कर वसुलीची नोटीस पाठवण्यात आली आहे.  आयकर कायद्याच्या कलम ३६(१)(1)(viia) अंतर्गत केलेल्या दाव्यांना नाकारत आयकर विभागाने ही नोटीस बजावली आहे. बँकेने या निर्णयाविरोधात अपील दाखल करण्याची प्रक्रिया सुरू केली असून, अनुकूल निकालाची अपेक्षा व्यक्त केली आहे.

फिजिक्सवाला लिमिटेडला मूल्यांकन वर्ष २०२३-२४ साठी २६३.३४ कोटींची कर वसुलीची नोटीस पाठवली आहे. कंपनीला मिळालेल्या गुंतवणुकीला करपात्र उत्पन्न मानत ही कारवाई करण्यात आली आहे. कंपनीने या प्रकरणात कायदेशीर पावले उचलण्याचा निर्णय घेतला असून; व्यवसायावर कोणताही मोठा परिणाम होणार नसल्याचा विश्वास व्यक्त केला आहे.

दरम्यान, या तिन्ही कंपन्यांच्या शेअर्समध्ये दिवसअखेर वाढ नोंदवली गेली, त्यामुळे गुंतवणूकदारांचा आत्मविश्वास कायम असल्याचे दिसून आले.

हेही वाचा