मुळगावची प्रसिद्ध ‘पेठेची जत्रा’ सोमवारपासून

२७ रोजी कौलोत्सवाने होणार सांगता

Story: प्रतिनिधी। गोवन वार्ता |
20th March, 06:33 pm
मुळगावची प्रसिद्ध ‘पेठेची जत्रा’ सोमवारपासून

डिचोली : डिचोली तालुक्यातील मुळगावची ग्रामदेवता श्रीदेवी केळबाई देवीचा प्रसिद्ध जत्रोत्सव येत्या सोमवार, दि. २३ मार्चपासून भक्तीमय वातावरणात सुरू होत असून शुक्रवार, दि. २७ मार्च रोजी कौलोत्सवाने त्याची सांगता होणार आहे. संपूर्ण गोव्यात ‘पेठेची जत्रा’ म्हणून प्रसिद्ध असलेला हा उत्सव दरवर्षी मोठ्या श्रद्धा आणि उत्साहात साजरा केला जातो.
गुढीपाडव्यापासूनच या जत्रेची खऱ्या अर्थाने सुरुवात होत असून देवीचे धोंडगण पाडव्यापासून नऊ दिवस सोवळे पाळतात. चैत्र शुद्ध पंचमीला मुख्य जत्रा साजरी होते. सोमवारी म्हणजे जत्रेच्या दिवशी सकाळपासून विविध धार्मिक विधी पार पडल्यानंतर दुपारी धोंडगण मंदिराशेजारील पवित्र तळीत स्नान करून पारंपरिक वेशभूषेत-शुभ्र बनियान, सोवळे, अंगावर शेला, गळ्यात अबोलीच्या फुलांची माळ (वळेसार) आणि हातात वेतकाठी घेऊन देवीचे दर्शन घेतात.
रात्री देवीचे प्रतीक असलेली ‘पेठ’ अबोलीच्या फुलांनी आकर्षकपणे सजवली जाते. मंदिर मंडपात ढोलाच्या तालावर ‘हर हर’च्या जयघोषात धोंडगणांचा नृत्याविष्कार पाहायला मिळतो. या वेळी हजारो भाविकांची उपस्थिती असते.
मध्यरात्री गावातील मानकरी आणि मये गावातील मानकऱ्यांच्या उपस्थितीत गाऱ्हाणे घातल्यानंतर अवसार आल्यावर पेठरूपी देवीचे प्रस्थान मये गावाकडे होते. व्हाळशी, बोर्डे, डिचोली मार्गे देवीचा प्रवास होत असून पहाटे मये गावात पोचते. तीन दिवस मये गावात वास्तव्य केल्यानंतर आणि मये गावची माल्याची जत्रा सुरू झाल्यानंतर देवी पुन्हा मुळगावात परतते.
मुळगावात आगमनानंतर कौलोत्सवाला प्रारंभ होतो. यंदा २७ मार्च रोजी हा उत्सव पार पडणार आहे. परंपरेनुसार राऊत, गाड, परब आणि सराफ कुटुंबीयांना ठराविक पारंपरिक ठिकाणी कौल दिला जातो. त्यानंतर वाजतगाजत पेठ मंदिराकडे नेऊन सर्व उपस्थित भाविक व मानकऱ्यांना कौल देण्यात येतो. शेवटी धोंडगणांना कौल दिल्यानंतर पेठरूपी देवी विश्रांती घेते. कौल घेतल्यानंतर धोंडगण पुन्हा तळीत स्नान करून आपले व्रत पूर्ण करतात. त्यानंतर पुढील पाच रात्री नाट्यप्रयोगांचे आयोजन केले जाते. असा हा पारंपरिक आणि भक्तिमय उत्सव मोठ्या उत्साहात साजरा होत असून, या जत्रेला भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून देवीचे आशीर्वाद घ्यावेत, असे आवाहन देवस्थान समिती आणि मुळगाव ग्रामस्थांनी तर्फे केले आहे.

हेही वाचा