बीसीसीआयच्या समालोचक पॅनलमधून लक्ष्मण शिवरामकृष्णन यांची निवृत्ती; रंगभेदाचे गंभीर आरोप

Story: वेब डेस्क। गोवन वार्ता |
21st March, 06:12 pm
बीसीसीआयच्या समालोचक पॅनलमधून लक्ष्मण शिवरामकृष्णन यांची निवृत्ती; रंगभेदाचे गंभीर आरोप

नवी दिल्ली : भारतीय क्रिकेट विश्वात एक मोठी आणि खळबळजनक घडामोड समोर आली आहे. भारताचे माजी दिग्गज लेग स्पिनर आणि गेली २३ वर्षे आपल्या खास शैलीतून क्रिकेट रसिकांचे मनोरंजन करणारे लक्ष्मण शिवरामकृष्णन यांनी बीसीसीआयच्या (BCCI) समालोचक पॅनलमधून निवृत्ती जाहीर केली आहे. मात्र, ही निवृत्ती वादाच्या भोवऱ्यात सापडली असून; त्यांनी बीसीसीआय आणि टीव्ही प्रोडक्शनवर गंभीर आरोप केले आहेत.

२० मार्च रोजी एक्स (ट्विटर) वर सलग पोस्ट करत शिवरामकृष्णन यांनी आपली नाराजी व्यक्त केली. त्यांनी दावा केला की, इतकी वर्षे काम करूनही त्यांना टॉस किंवा प्रेझेंटेशनसारख्या महत्त्वाच्या जबाबदाऱ्यांपासून जाणीवपूर्वक दूर ठेवण्यात आले. त्याऐवजी नवख्या समालोचकांना वारंवार संधी देण्यात आली, असा आरोप त्यांनी केला.

सर्वात धक्कादायक बाब म्हणजे, एका चाहत्याने विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना त्यांनी थेट रंगभेदाचा आरोप केला. “हो, तुम्ही बरोबर ओळखलेय, हा रंगभेदच आहे,” असे स्पष्ट वक्तव्य करत त्यांनी मोठा वाद निर्माण केला आहे.

शिवरामकृष्णन यांचा संताप केवळ या मुद्द्यावर मर्यादित नसून, गेल्या दोन दशकांत अनेक नवोदित समालोचकांना महत्त्वाच्या भूमिका मिळाल्या, तर स्वतःला केवळ कॉमेंट्री बॉक्सपुरते मर्यादित ठेवण्यात आले, असेही त्यांनी नमूद केले. “स्वाभिमान गहाण ठेवून लाळघोटेपणा मला जमत नाही,” अशा ठाम शब्दांत त्यांनी आपली भूमिका मांडली.

१९८० च्या दशकात चमकदार कामगिरी करणाऱ्या शिवरामकृष्णन यांनी १९८५ च्या विश्वकप चाम्पियन स्पर्धेत (1985 World Cricket  Championship)  मध्ये भारताच्या विजेतेपदात मोलाची भूमिका बजावली होती. ९ कसोटी आणि १६ एकदिवसीय सामन्यांचा अनुभव असलेल्या या खेळाडूने २००० पासून समालोचन क्षेत्रात स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली होती.

दरम्यान, बीसीसीआय किंवा अधिकृत ब्रॉडकास्टरकडून अद्याप कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया आलेली नाही. शिवरामकृष्णन यांनी स्पष्ट केले की, आपण रणजी (Ranji Trophy)  आणि विजय हजारे करंड (Vijay Hazare Trophy) या सारख्या देशांतर्गत स्पर्धांसाठी समालोचन सुरू ठेवणार आहे. मात्र, आंतरराष्ट्रीय सामने आणि आयपीएल मधून पूर्णपणे दूर राहणार आहे.

हेही वाचा