क्लब टेनिस डी गॅस्पर डायस व्याख्यानमाला : यश फडतेने उलगडला ऑलिम्पिकपर्यंतचा प्रवास

पणजी: हा गोव्यातून आला आहे, हा काय करू शकतो? ही २०१० मधील एका उपरोधिक प्रश्नाची ठिणगीच माझ्या यशाचा पाया ठरली, अशा शब्दांत आंतरराष्ट्रीय स्क्वॉशपटू यश फडते याने आपल्या प्रेरणादायी प्रवासाचा उलगडा केला. मिरामार येथील क्लब टेनिस डी गॅस्पर डायसच्या शताब्दी व्याख्यानमालेत पुष्प गुंफताना तो बोलत होता.
यशने सांगितले की, २०१० मध्ये मलेशियातील पहिल्या आंतरराष्ट्रीय स्पर्धेत सहभागी होताना अवघ्या ९ वर्षांच्या यशला कमी लेखले गेले होते. मात्र, त्याच स्पर्धेत उपविजेतेपद पटकावत त्याने टीकाकारांना गप्प केले. तो प्रश्नच माझा खरा गुरुमंत्र ठरला आणि तिथूनच माझ्या जिद्दीला सुरुवात झाली, असे यशने नमूद केले.
रणजी क्रिकेटपटू दिलीप फडते यांचा मुलगा असलेल्या यशचा कल क्रिकेटऐवजी स्क्वॉशकडे वळला. वयाच्या सातव्या वर्षी वडिलांनीच त्याला या खेळाची ओळख करून दिली. गोव्यात सोयीसुविधा मर्यादित असतानाही, तो दर आठवड्याला मुंबईतील क्रिकेट क्लब ऑफ इंडियामध्ये सराव करण्यासाठी जात असे. या प्रवासात शाळा आणि पालकांनी दिलेल्या पाठिंब्यामुळेच तो देशातील अव्वल ज्युनियर खेळाडू बनू शकला.
शिक्षण आणि खेळ यांचा समतोल राखत यशने न्यूयॉर्कमधील युनिव्हर्सिटी ऑफ रोचेस्टर येथे १०० टक्के शिष्यवृत्तीवर (वार्षिक ८५,००० डॉलर्स) प्रवेश मिळवला. तिथे त्याने स्क्वॉशमध्ये आपली मोहोर उमटवली. सलग तीन वर्षे 'प्लेअर ऑफ द इयर' किताब मिळवला. अमेरिकेतील ३,५०० महाविद्यालयांमधून दिला जाणारा प्रतिष्ठेचा 'स्किलमन अवॉर्ड' (२०२५) पटकावला. 'रुकी ऑफ द इयर' म्हणूनही गौरव करण्यात आला.
अभ्यासासाठी अनावश्यक दबाव नको
यश सध्या बार्सेलोना येथील प्रीमियर अकॅडमीत सराव करत असून, ऑलिम्पिकमध्ये भारताचे प्रतिनिधित्व करणे हे त्याचे मुख्य ध्येय आहे. पालकांना सल्ला देताना तो म्हणाला, जर मुले अवांतर उपक्रमात चांगली कामगिरी करत असतील, तर त्यांच्यावर अभ्यासाचा अनावश्यक दबाव टाकू नका. खेळातील कौशल्यामुळेच मला हार्वर्डसारख्या नामांकित विद्यापीठांतून संधी मिळाली. सरकारी अनुदानांबाबत बोलताना त्याने काहीसा खेद व्यक्त केला की, काही महत्त्वाच्या योजनांपासून तो वंचित राहिला; मात्र प्रायोजकांच्या पाठबळामुळे त्याने खेळावर लक्ष केंद्रित केले आहे.
विशेष: क्लब टेनिस डी गॅस्पर डायसच्या शताब्दी वर्षानिमित्त आयोजित व्याख्यानमालेतील हे समारोपाचे व्याख्यान होते.