कदंब काळातील 'पाहजनी खली', आदिल शाहची 'पांच यमा अफसुमगरी' ते आजची 'स्मार्ट सिटी-पणजी'. काय बदलले हजार वर्षांत ? वाचा सविस्तर

पणजी: मांडवी नदीच्या तीरावर वसलेले आणि अरबी समुद्राच्या मुखाशी विसावलेले पणजी शहर आज जागतिक पर्यटनाच्या नकाशावर झळकत आहे. मात्र, या शहराचा इतिहास केवळ पर्यटन किंवा आधुनिकतेपुरता मर्यादित नाही. १८ व्या शतकाच्या मध्यापर्यंत पणजी हे एक छोटेसे, दुर्लक्षित खेडे होते. त्याकाळी गोव्याची राजधानी 'वेल्हा गोवा' (जुने गोवा) येथे होती. परंतु, तिथे पसरलेल्या प्लेगच्या साथीने पोर्तुगीजांना हादरवून सोडले. आरोग्याच्या कारणास्तव आणि प्रशासकीय सोयीसाठी पोर्तुगीजांनी राजधानी हलवण्याचा निर्णय घेतला आणि २२ मार्च १८४३ रोजी पणजीला 'नोव्हा गोवा' (नवीन गोवा) या नावाने शहराचा दर्जा देऊन राजधानी म्हणून घोषित करण्यात आले. आज या ऐतिहासिक घटनेला १८३ वर्षे पूर्ण होत आहेत.

कदंब काळापासूनचा प्राचीन वारसा
पणजीचा इतिहास पोर्तुगीज आगमनापूर्वीही अस्तित्वात होता. ऐतिहासिक नोंदींनुसार, कदंब राजा शस्थदेव (१००७-१०५०) यांच्या काळातही या परिसराचे महत्त्व होते. कदंब राजा विजयादित्य प्रथम यांच्या ११०७ मधील एका शिलालेखात या ठिकाणाचा उल्लेख 'पाहजनी खली' असा आढळतो. पणजी या नावाच्या उत्पत्तीबाबत अनेक तर्क लावले जातात. काहींच्या मते, 'पणजी' म्हणजे अशी जमीन जिला कधीही पूर येत नाही. तर दुसऱ्या एका संदर्भानुसार, मुस्लिम बादशाह इस्माईल आदिल शाह आणि त्याच्या राण्या जिथे राहत असत, त्या 'पांच यमा अफसुमगरी' (पाच अद्भुत किल्ले) या नावावरून हे नाव रूढ झाले असावे. पोर्तुगीजांनी या नावाचे रूपांतर 'पांजिम' मध्ये केले आणि १९६१ च्या मुक्तीनंतर ते पुन्हा 'पणजी' म्हणून ओळखले जाऊ लागले.

आदिलशाही किल्ले ते सचिवालयाचा प्रवास
मध्ययुगीन काळाच्या सुरुवातीला पणजी हा ताळगाव गावाचाच एक भाग होता. १५ व्या शतकात मांडवीच्या दक्षिण तीरावर आदिल शाहने बांधलेला किल्ला हीच या भागातील एकमेव महत्त्वाची वास्तू होती. पुढे व्हॉईसरॉय डॉम मॅन्युअल डी साल्दान्हा डी अल्बुकर्क (काउंट ऑफ एगा) यांनी या जुन्या किल्ल्याचे नूतनीकरण केले आणि तिथे राजवाडा उभारला, जो नंतर सरकारी सचिवालय म्हणून वापरला गेला. किल्ल्याभोवतीचा खंदक बुजवून तिथे रस्ता तयार करण्यात आला आणि १५ व्या शतकातील त्या भव्य वास्तूचे रूपांतर प्रशासकीय केंद्रात झाले.
धार्मिक आणि वास्तुकलेचा संगम
ख्रिश्चन धर्माच्या प्रसाराच्या सुरुवातीच्या काळात, ताळगाव परिसरात तीन मुख्य चर्च उभारली गेली. १५४१ च्या सुमारास पणजीच्या एका टेकडीवर 'अवर लेडी ऑफ कन्सेप्शन' हे छोटे चर्च बांधले गेले. या टेकडीला 'हिल ऑफ कन्सेप्शन' असे नाव पडले. १६०० मध्ये याचे रूपांतर पॅरोखियल चर्चमध्ये झाले आणि १६१९ मध्ये त्याची पुनर्रचना करण्यात आली. आज या चर्चच्या ज्या भव्य पांढऱ्या पायऱ्या आपण पाहतो, त्या १८७० मध्ये बांधल्या गेल्या आहेत. त्याचप्रमाणे सांतिनेझ आणि ताळगाव येथेही १६ व्या शतकात चर्च उभारण्यात आली. यामुळे या भागाच्या नागरीकरणाला धार्मिक अधिष्ठान मिळाले.

फादर ऑफ पणजी: डॉम मॅन्युअल डी पोर्तुगाल ई कास्ट्रो
पणजीला खऱ्या अर्थाने शहराचे स्वरूप देण्याचे श्रेय व्हॉईसरॉय डॉम मॅन्युअल डी पोर्तुगाल ई कास्ट्रो (१८२६-३५) यांना जाते. त्यांना 'पणजीचे जनक' मानले जाते. त्यांनी मांडवीच्या दलदलीचा आणि वाळूच्या ढिगाऱ्यांचा भाग भरून काढण्याचे आव्हान यशस्वीरित्या पेलले. कांपाल ते ताळगाव पर्यंतचा भाग सपाट करून तिथे नवीन वस्ती वसवली. पावसाळ्यात पाणी तुंबू नये म्हणून त्यांनी दोन मोठे कालवे आणि रोमन शैलीतील कमानींचे पूल बांधले. आजची पोलीस मुख्यालय, मध्यवर्ती वाचनालय आणि सीमा शुल्क विभाग असलेली अनेक भव्य संकुले त्यांच्याच पुढाकाराने उभी राहिली.
लिन्हेरिस कॉजवे: ४०० वर्षे ऊन-पावसापाण्याचा मारा झेलत उभा असलेला अद्भुत वास्तू चमत्कार
पणजीला रायबंदरशी जोडणारा ३.२ किलोमीटर लांबीचा 'लिन्हेरिस कॉजवे' हा इंजिनिअरिंगचा एक अद्भुत नमुना आहे. १६३२ मध्ये जुन्या गोव्यातील सेंट पॉल कॉलेजच्या जेसुइट्सनी याची आखणी केली. दलदलीच्या जमिनीत 'झांबो' नावाच्या स्थानिक झाडांचे बुंधे गाडून पाया मजबूत करण्यात आला आणि त्यावर चिरेबंदी दगड वापरून हा पूल बांधला गेला. विशेष म्हणजे, ज्या काळी हा पूल केवळ घोडागाड्यांसाठी बनवला होता, तो आजही ४०० वर्षांनंतर अवजड वाहनांची वाहतूक लीलया पेलत आहे.

फाँटेन्हास आणि लॅटिन संस्कृतीची झलक
शहराच्या पूर्वेला असलेले 'फाँटेन्हास' हे क्षेत्र एकेकाळी नारळाच्या बागांनी नटलेले होते. १७५० च्या सुमारास ही जमीन अँटोनियो जोआओ डी सिक्वेरा यांना भाड्याने देण्यात आली होती. नंतर ती कार्मेलाईट नन्सना दान करण्यात आली. फाँटेन्हास आणि मळा परिसरातील अरुंद रस्ते, पिवळ्या-निळ्या रंगाची घरे आणि लॅटिन प्रभाव असलेली वास्तुकला आजही पोर्तुगीज काळाची आठवण करून देते. गव्हर्नर जोआकिम जोसे हानुआरीओ लापा (१८५१-५५) यांच्या काळात येथील फेनिक्स कारंजे आणि बोका द वाका येथील कारंजे बांधले गेले. येथून शहराला पिण्याचे पाणी पुरवले जाई.
आधुनिक पणजीचा विकास आणि विस्तार
१८७८ मध्ये गव्हर्नर कायतानो अलेक्झांड्रे डी अल्बुकर्क यांनी कन्सेप्शन हिलचा अडथळा दूर फाँटेन्हास आणि शहराचा मध्यवर्ती भाग जोडला. १९३१ मध्ये शहरात वीज आली आणि १९५७ मध्ये २४ तास पाणीपुरवठा सुरू झाला. मुक्तीपूर्व काळात १९६० मध्ये गव्हर्नर मॅन्युअल अँटोनियो वासालो ई सिल्वा यांनी पणजीच्या सौंदर्यीकरणाचा महत्त्वाकांक्षी आराखडा मांडला होता. मांडवी हॉटेल ते कला अकादमीपर्यंतचा भव्य रस्ता, जो आज 'दयानंद बांदोडकर मार्ग' म्हणून ओळखला जातो, तो या शहराचे वैभव वाढवणारा ठरला.

आज पणजी ही केवळ गोव्याची प्रशासकीय राजधानी नाही, तर ती एक सांस्कृतिक वारसा असलेली नगरी आहे. उंच खिडक्या, उतरती छपरे आणि दरवर्षी पांढऱ्या रंगाने रंगवलेली घरे ही या शहराची ओळख आहे. काळानुसार शहरात सिमेंटची जंगले उभी राहिली असली, तरी पणजीच्या जुन्या गल्ल्यांमधून फिरताना आजही १८३ वर्षांच्या इतिहासाची छाप दृष्टीस पडते.
![]()