मिळणार २५ ते ३० हजार रुपयांचे मानधन; प्रशिक्षणासाठी मास्टर ट्रेनर्सची नियुक्ती.

पणजी: देशाच्या आगामी जनगणनेच्या कामाला लवकरच सुरुवात होणार असून, गोव्यातील शिक्षकांवर या महत्त्वाच्या राष्ट्रीय कार्याची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. या जनगणनेच्या पहिल्या टप्प्यासाठी काम करणाऱ्या प्राथमिक शिक्षकांना २५ हजार रुपये, तर पर्यवेक्षक म्हणून काम पाहणाऱ्या विद्यालयीन शिक्षकांना ३० हजार रुपयांचे मानधन दिले जाणार असल्याची माहिती सरकारी सूत्रांकडून प्राप्त झाली आहे. कोरोना महामारीमुळे प्रलंबित असलेली ही जनगणना आता डिजिटल पद्धतीने पार पडणार असून, प्रशासनाने त्या दृष्टीने जय्यत तयारी सुरू केली आहे.
उत्तर गोव्याचे जिल्हाधिकारी अंकित यादव यांनी दिलेल्या माहितीनुसार, जनगणनेचा पहिला टप्पा १६ एप्रिल ते १५ मे या कालावधीत राबवला जाणार आहे. या प्रक्रियेत प्राथमिक शिक्षक 'गणक' (इनुमरेटर) म्हणून घरोघरी जाऊन माहिती गोळा करतील, तर उच्च प्राथमिक किंवा विद्यालयीन शिक्षक 'पर्यवेक्षक' म्हणून त्यांच्या कामावर देखरेख ठेवतील. साधारणपणे सहा गणकांमागे एक पर्यवेक्षक नियुक्त केला जाईल. या संपूर्ण प्रक्रियेत माहिती संकलनासाठी शिक्षकांना स्वतःच्या मोबाईलचा वापर करावा लागणार आहे. ज्या ठिकाणी मोबाईल रेंज उपलब्ध नसेल, तिथे माहिती हस्तलिखित स्वरूपात नोंदवण्याची मुभा देण्यात आली आहे.
प्रशासकीय रचनेनुसार, ग्रामीण भागातील जनगणनेच्या कामाचे प्रमुख म्हणून संबंधित तालुक्याचे मामलेदार जबाबदार असतील, तर शहरी भागातील कामाची जबाबदारी उपजिल्हाधिकाऱ्यांकडे सोपवण्यात आली आहे. सध्या या कामासाठी 'मास्टर ट्रेनर्स'चे प्रशिक्षण सुरू असून उत्तर गोव्यासाठी २२ आणि दक्षिण गोव्यासाठी २८ मास्टर ट्रेनर्स नियुक्त करण्यात आले आहेत. हे मास्टर ट्रेनर्स पुढील टप्प्यात सर्व संबंधित शिक्षकांना जनगणनेच्या तांत्रिक पैलूंचे प्रशिक्षण देणार आहेत. शिक्षकांना त्यांच्या दैनंदिन कामाचा अहवाल दररोज पर्यवेक्षकांकडे सादर करावा लागणार आहे.
साधारणपणे दर दहा वर्षांनी होणारी ही प्रक्रिया यंदा विलंबनाने होत असली तरी, ती अधिक अचूक आणि वेगवान व्हावी यासाठी डिजिटल माध्यमाचा वापर केला जात आहे. केवळ गोवाच नव्हे, तर इतर राज्यांमध्येही शिक्षकांच्या माध्यमातूनच हे काम पूर्ण केले जाते. ज्या शिक्षकांकडे कामाचा ताण कमी आहे किंवा ज्यांना सुटी आहे, अशाच शिक्षकांची नेमणूक या कामासाठी केली जाईल, असेही जिल्हाधिकारी अंकित यादव यांनी स्पष्ट केले आहे.