बर्च क्लब अग्नीतांडव : सहमालक अजय गुप्ताला सशर्त जामीन

Story: प्रतिनिधी।गोवन वार्ता |
23rd March, 05:15 pm
बर्च क्लब अग्नीतांडव : सहमालक अजय गुप्ताला सशर्त जामीन

 म्हापसा : बर्च क्लब अग्नीतांडव (Birch club fire)  प्रकरणातील संशयित आरोपी क्लबचे सहमालक अजय गुप्ता याची  अतिर‌िक्त जिल्हा व सत्र न्यायालयाने (Additional District & session court) सशर्त जामीनावर सुटका केली आहे. ५० हजार रुपये हमी रक्कम आणि तितक्याच रकमेचा हमीदार तसेच इतर अटींवर न्यायालयाने जामीन अर्ज मंजूर केला.   न्यायाधीश द्विजपल पाटकर यांनी सोमवारी हा जामीन अर्ज मंजूर केला. 

यावेळी न्यायालयात गुप्ता याच्या वतीने बाजू मांडणारे ज्येष्ठ वकील अ‍ॅड. नितीन सरदेसाई यांच्यासह ॲड. आर. देसाई, अ‍ॅड एस. सक्सेना उपस्थित होते. तर सरकारच्या वतीने सरकारी वकील जेनिफर सांतामारिया आणि एच. घाटे हजर होते.

गेल्या २३ रोजी झालेल्या सुनावणीवेळी न्यायालयाने प्रतिवादींचे युक्तीवाद ऐकूण घेतल्यानंतर निवाडा राखून ठेवला होता.

दरम्यान, ६ डिसेंबर २०२५ रोजी रात्री घडलेल्या बर्च क्लब आग दुर्घटना प्रकरणी हणजूण पोलिसांनी अजय गुप्ता याला दिल्लीतून अटक केली होती. त्यानंतर संशयित प्रथम पोलीस व नंतर न्यायालयीन कोठडीत आहे. या दुर्घटनेमध्ये २५ निष्पाप लोकांचा बळी गेला होता. तर सहा जण जखमी झाले होते.

पोलिसांनी याप्रकरणी संशयित अजय गुप्तासह  १४ जणांविरूध्द न्यायालयात आरोपपत्र सादर केलेले असून; या खटल्याची सुनावणी सुरू झाली आहे.