अमेरिकेने इराणच्या वीज प्रकल्पांवरील हल्ले केले स्थगित; तणावात दिलासा

युद्ध थांबवण्यासाठी चर्चा सुरू, तेल, वायूच्या किमतीत घट

Story: वेब डेस्क। गोवन वार्ता |
23rd March, 06:04 pm
अमेरिकेने इराणच्या वीज प्रकल्पांवरील हल्ले केले स्थगित;  तणावात दिलासा

वॉशिंग्टन/तेहरान : मध्यपूर्वेतील युद्धजन्य परिस्थितीत काहीसा दिलासा देणारी घडामोड समोर आली आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) यांनी इराणच्या (Iran) वीज प्रकल्पांवर (Power Plant)  नियोजित हल्ले तात्पुरते स्थगित केल्याची घोषणा केली आहे. युद्ध संपवण्यासाठी सुरू झालेल्या “सकारात्मक चर्चां”मुळे हा निर्णय घेतल्याचे त्यांनी सांगितले.

ट्रम्प यांनी म्हटले की, अमेरिका (USA) आणि इराण यांच्यात “पूर्ण आणि अंतिम शत्रुत्व समाप्ती”संदर्भात चर्चा झाली असून; त्यातून सकारात्मक संकेत मिळाले आहेत. या घोषणेनंतर जागतिक बाजारात त्वरित परिणाम दिसून आला आहे. तेल आणि वायूच्या किमतीत घट नोंदवली गेली.

याआधी शनिवारी रात्री ट्रम्प यांनी इराणला होर्मुझ सामुद्रधुनी ( Strait of Hormuz)  पुन्हा खुला करण्यासाठी ४८ तासांचा अल्टिमेटम दिला होता. अन्यथा इराणचे वीज प्रकल्प पूर्णत: नष्ट करण्याचा इशाराही त्यांनी दिला होता. मात्र, ताज्या भूमिकेत त्यांनी मवाळ सूर लावत हल्ले पुढे ढकलले आहेत.

दरम्यान, इराणमधील एका वृत्तसंस्थेने नाव न सांगण्याच्या अटीवर दिलेल्या माहितीनुसार, तेहरान आणि ट्रम्प यांच्यात कोणतीही औपचारिक चर्चा झालेली नाही, असा दावा करण्यात आला आहे. त्यामुळे या घडामोडींवर अजूनही अनिश्चिततेचे सावट आहे.

याच पार्श्वभूमीवर ब्रिटनचे पंतप्रधान कीर स्टार्मर (Keir Starmer) आणि डोनाल्ड ट्रम्प यांच्यात रविवारी उशिरा दूरध्वनीवर चर्चा झाली. जागतिक समुद्री वाहतूक पुन्हा सुरळीत करण्यासाठी होर्मुझ सामुद्रधुनी मार्ग खुला करणे अत्यावश्यक असल्याचे दोन्ही नेत्यांनी मान्य केले.

दरम्यान, इस्त्रायलच्या संरक्षण दलाने (Israel Defense Forces (IDF))  इराण आणि लेबनॉनमधील हिझबुल्लाहविरुद्ध आणखी काही आठवडे लढाई सुरू राहण्याची शक्यता व्यक्त केली आहे. त्यामुळे एकीकडे संवादाची प्रक्रिया सुरू असताना दुसरीकडे संघर्ष कायम राहण्याची चिन्हे दिसत आहेत.

हेही वाचा