
मडगाव : घोगळ, फातोर्डा (Fatorda) येथील सुन्नी गुलिस्तान मशिदीचे उपाध्यक्ष अली खान यांच्या हत्या प्रकरणात आणखी एका संशयिताला अटक केली आहे. अनेक दिवसांपासून फरार असलेल्या अल्ताफ शाह सय्यद याला बंगळुरू विमानतळावर (Bengaluru Airport) ताब्यात घेत अटक करण्यात आली आहे.
फातोर्डा पोलिसांना (Fatorda Police) अली खान प्रकरणात तपासादरम्यान फरार असलेला संशयित अल्ताफ हा दुबईहून भारतात परत येत असल्याची माहिती मिळाली. यानंतर पोलिसांनी सापळा रचून त्याला बंगळुरू विमानतळावरून ताब्यात घेतले. या खून प्रकरणात अटक करण्यात आलेला हा नववा संशयित आहे.
फातोर्डा पोलीस निरीक्षक दितेंद्र नाईक यांनी दिलेल्या माहितीनुसार, संशयित अल्ताफला बंगळुरू विमानतळावर ताब्यात घेण्यात आलेले असून; त्याचा ताबा घेण्यासाठी पोलिसांचे एक पथक बंगळुरूला रवाना झाले आहे.
३० जानेवारी २०२६ रोजी नमाजानंतर मशिद समितीच्या वर्चस्वाच्या वादातून अली खान यांच्यावर चाकूने हल्ला झाला. गंभीर जखमी झालेल्या अली खान यांचा यात मृत्यू झाला. खून प्रकरणात कट रचण्यात सहभागी असलेला अल्ताफ खुनाच्या घटनेच्या दोन दिवस आधीच दुबईला गेला होता, जेणेकरून त्याचा या गुन्ह्याशी संबंध जोडू नये, असा संशय पोलिसांना आहे.
पोलिसांनी यापूर्वी या प्रकरणात मुख्य संशयित अक्रम खान याच्यासह साहिल कन्वी, आलम सय्यद, लतीफ सय्यद, उबेद्दुला मकानदार, सक्रुद्दिन शेख, हुसेन खान, निजामुद्दीन सय्यद अशा आठ जणांना अटक केली आहे. सध्या मुख्य संशयित अक्रम खान आणि साहिल कन्वी न्यायालयीन कोठडीत आहेत, तर इतर काहींना जामीन मंजूर झाला आहे. याच प्रकरणातील सर्फराज मकानदार आणि मेहबूब मकानदार या दोन भावांचा अटकपूर्व जामीन न्यायालयाने आधीच फेटाळला आहे.