घरात घुसून हल्ला; कोलवा पोलिसांकडून पाच जणांना अटक

Story: प्रतिनिधी।गोवन वार्ता |
25th March, 04:58 pm
घरात घुसून हल्ला; कोलवा पोलिसांकडून पाच जणांना अटक

मडगाव : कार्मोणा येथे भाड्याच्या खोलीत घुसून जितेन्द्र कासार्लेकर (रा. मूळ खानापूर, कर्नाटक) यांच्यावर प्राणघातक हल्ला (Attempt to Murder)  करण्यात आला.  याप्रकरणी कोलवा पोलिसांनी पाच जणांना अटक केली आहे.

संशयित लेन्नी सिल्वेरा (३४ वर्षे, रा. कार्मोणा), इस्साक राउल दुरांदो (२४ वर्षे, रा. आंबेली), सज्जन शिरोडकर (४० वर्षे, रा. कार्मोणा), नारायण शिरोडकर (रा. कार्मोणा), आयुष बारीक (२४ वर्षे,  रा. कार्मोणा) या पाच संशयितांना कोलवा पोलिसांनी (Colva Police) अटक (Arrested)  केली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, मारहाणीची घटना २३ मार्च रोजी पहाटे ३.३७ वाजण्याच्या सुमारास घडली. मूळचा खानापूर (बेळगाव, कर्नाटक) येथील रहिवासी असलेला जितेन्द्र कासार्लेकर कार्मोणा येथे भाड्याच्या खोलीत राहत होता.

यावेळी संशयित लेनी आणि त्याच्यासोबत चारजणांनी जितेन्द्रच्या खोलीचा दरवाजा तोडून घरात बेकायदेशीर प्रवेश केला. त्यानंतर संशयितांनी जितेन्द्रवर धारदार शस्त्राने हल्ला केला. या हल्ल्यात जितेन्द्रच्या मानेवर गंभीर जखम झाली असून, छाती आणि खांद्यावरही वार करण्यात आले आहेत.

प्रल्हाद कासार्लेकर यांच्या तक्रारीनंतर पोलिसांनी गुन्हा नोंद केला होता. यानंतर पोलीस निरीक्षक विक्रम नाईक यांच्या मार्गदर्शनाखाली तत्काळ तपास सुरू  करण्यात आला.