'.. माझ्या अंगात दैवी शक्ती; सांगितलेले न ऐकल्यास मुलांचा मृत्यू निश्चित!' खरातची पीडितांना धमकी

नाशिकच्या सरकारवाडा पोलीस स्थानकातच खरातविरोधात एकापाठोपाठ एक असे तब्बल पाच एफआयआर दाखल

Story: वेब डेस्क । गोवन वार्ता |
25th March, 05:54 pm
'.. माझ्या अंगात दैवी शक्ती; सांगितलेले न ऐकल्यास मुलांचा मृत्यू निश्चित!' खरातची पीडितांना धमकी

नाशिक: अध्यात्म, दैवी शक्ती आणि अवताराचा बनाव रचून महिलांचे लैंगिक शोषण करणाऱ्या अशोक खरात नावाच्या नराधमाच्या काळ्या कारनाम्यांनी संपूर्ण नाशिकसह महाराष्ट्र हादरून गेला आहे. नाशिकच्या सरकारवाडा पोलीस स्थानकातच खरातविरोधात एकापाठोपाठ एक असे तब्बल पाच एफआयआर दाखल झाले असून, यातील माहिती कोणत्याही सुसंस्कृत समाजाची झोप उडवणारी आहे. ओक्स प्रॉपर्टीजच्या नावाखाली चालणाऱ्या या अघोरी आणि पाशवी साम्राज्याचा पोलिसांनी आता पर्दाफाश केला असून, जादूटोणा विरोधी कायद्यासह बलात्काराचे गंभीर गुन्हे खरातवर नोंदवण्यात आले आहेत.

पोलिसांनी दाखल केलेल्या पहिल्या एफआयआरनुसार, फेब्रुवारी २०२० ते मार्च २०२६ या प्रदीर्घ काळात खरातने एका महिलेला आपल्या कार्यालयात बोलावून तांब्याच्या बाटलीतील मंतरलेले पाणी पिण्यास दिले. या पाण्याचा प्रभाव आणि धार्मिक विधीच्या नावाखाली त्याने महिलेवर वारंवार अत्याचार केले. या शोषणातून पीडित महिला गरोदर राहिली असता, तिला जबरदस्तीने गर्भपाताच्या गोळ्या देण्यात आल्या. विशेष म्हणजे, या कृत्याची वाच्यता केल्यास मुलांचे वाईट होईल, अशी भीती घालून त्याने पीडितेचे तोंड बंद ठेवले होते.

दुसऱ्या तक्रारीत खरातच्या विकृतीचा कळस पाहायला मिळतो. गरोदरपणात धार्मिक विधी करण्याच्या बहाण्याने त्याने एका महिलेला बोलावून तिच्यावर बलात्कार केला. केवळ लैंगिक शोषणच नव्हे, तर सिन्नर येथील मंदिरात बनावट साप आणि वाघ दाखवून लोकांमध्ये दहशत निर्माण करणे, तसेच कार्यालयात येणाऱ्या महिलांना लघवी पाजण्यासारखे अत्यंत घृणास्पद आणि अघोरी प्रकार त्याने केल्याचे तपासात समोर आले आहे.

तिसऱ्या आणि चौथ्या एफआयआरमधील हकीकतही तितकीच भयानक आहे. स्वत:मध्ये दैवी शक्ती असल्याचा दावा करत खरातने अनेक महिलांच्या असहाय्यतेचा फायदा घेतला. पतीला कार्यालयाबाहेर पाठवून महिलांना एकटे गाठणे, मंत्र पुटपुटून आणि शरीराला अयोग्य स्पर्श करून त्यांची 'शुद्धी' करण्याचे नाटक त्याने रचले. मुलगा व्हावा किंवा कौटुंबिक अडचणी सुटाव्यात या आशेने गेलेल्या महिलांना गुंगीचे पदार्थ देऊन त्यांच्यावर जबरदस्तीने शारीरिक संबंध प्रस्थापित करण्यात आले. मी देवाचा अवतार आहे, माझ्याशी संबंध ठेवल्यानेच तुझी शुद्धी होईल, अशा थापा मारून तो महिलांची फसवणूक करत होता.

पाचव्या एफआयआरमध्ये खरातने स्वतःला साक्षात 'शंकराचा अवतार' असल्याचे घोषित केले होते असे समोर आले आहे. जर त्याच्या इच्छांना विरोध केला तर मुलांचा सर्पदंश होऊन मृत्यू होईल, अशी टोकाची भीती त्याने पीडित महिलांना घातली होती. २०१४ पासून सुरू असलेला हा अत्याचाराचा सिलसिला २०२४ पर्यंत अखंडित सुरू होता. मिठाईतून गुंगीचे औषध देणे आणि इच्छेविरुद्ध बलात्कार करणे हा त्याचा शिरस्ता बनला होता.

या एकंदरीत प्रकरणाचे गांभीर्य ओळखून महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत अत्यंत कठोर भूमिका मांडली आहे. अशोक खरात स्वतःला दैवी अवतार असल्याचे सांगून महिलांना चुकीच्या पद्धतीने स्पर्श करत असे. आध्यात्मिक विधीच्या नावाखाली तो महिलांना तीर्थ म्हणून स्वतःचे मूत्र पाजत असे, असा खळबळजनक खुलासा मुख्यमंत्र्यांनी केला. खरातची ही विकृती समाजासाठी घातक असून त्याला कोणत्याही परिस्थितीत पाठीशी घातले जाणार नाही, अशी ग्वाही त्यांनी दिली. मुख्यमंत्र्यांच्या या भूमिकेचे खासदार सुप्रिया सुळे यांनीही स्वागत केले असून, अंधश्रद्धा निर्मूलनाचा वारसा पुढे नेल्याबद्दल त्यांचे आभार मानले आहेत.

नाशिक पोलिसांनी आता या प्रकरणाचा तपास अधिक तीव्र केला आहे. धार्मिक भीती घालून किंवा अमली पदार्थांचा वापर करून खरातने आणखी किती महिलांचे आयुष्य उद्ध्वस्त केले आहे, याचा शोध घेतला जात आहे. सात गुन्हे दाखल झाल्यामुळे या प्रकरणाची व्याप्ती वाढली असून, पोलीस आता खरातच्या आर्थिक व्यवहारांची आणि त्याच्या समर्थकांचीही चौकशी करत आहेत. श्रद्धा आणि अंधश्रद्धा यांच्यातील पुसट रेषेचा फायदा घेऊन वासनांध खेळ खेळणाऱ्या या 'कॅप्टन' खरातला आता कठोर कायदेशीर शिक्षेच्या सामोरे जावे लागणार आहे.


हेही वाचा