तेल संकट अधिक गहिरे; आखातातील फारसच्या खाडीत ५०० तेल टँकर अडकले

Story: वेब डेस्क। गोवन वार्ता |
25th March, 06:12 pm
तेल संकट अधिक गहिरे; आखातातील फारसच्या खाडीत ५०० तेल टँकर अडकले

तेहरान : इराण- अमेरिका-इस्त्रायल (Iran-USA-Israel) युद्धामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीमुळे आखातातील फारसच्या खाडीत (Persian Gulf)  सध्या सुमारे ५०० तेल टँकर (Oil Tanker) अडकून पडले आहेत. त्यापैकी बहुतेक पुढे सरकण्यास तयार नाहीत. युद्धपूर्व काळात दररोज सुमारे ८० तेल व गॅस टँकर या मार्गाने वाहतूक करत होते.  मात्र सध्याच्या तणावपूर्ण परिस्थितीमुळे हा प्रवाह जवळपास ठप्प झाला आहे.

जहाज मालक आणि विमा कंपन्या धोका कमी झाल्याशिवाय टँकर पुढे पाठवण्यास तयार नाहीत. जोखीम कायम राहिल्यास या मार्गाचा वापर टाळला जाईल, अशी भूमिका त्यांनी घेतली आहे.

अमेरिकेकडून मोठ्या प्रमाणात एस्कॉर्ट (सुरक्षा) मोहीम राबवली तरी एकाच वेळी मर्यादित जहाजांनाच संरक्षण देणे शक्य आहे. त्यामुळे सर्व टँकरांना एकाच वेळी सुरक्षित मार्ग देणे अवघड ठरणार आहे.

इराणकडून जहाजांवर हल्ले 

दरम्यान, इराणकडून केवळ होर्मुझ सामुद्रधुनीतच नव्हे, तर फारसच्या आखातात आणि ओमानच्या आखातातही जहाजांवर हल्ले झाल्याच्या घटना समोर आल्या आहेत. त्यामुळे संपूर्ण मार्गावर सुरक्षा देणे आवश्यक ठरत असून; ही मोहीम अधिक दीर्घ आणि गुंतागुंतीची बनत आहे.

या मोठ्या लष्करी कारवाईमुळे अमेरिकेच्या इतर भागातील लष्करी क्षमतेवरही ताण येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.  कारण संसाधने अन्य भागांतून वळवावी लागू शकतात.

तोपर्यंत परिस्थिती पूर्ववत होणे कठीण 

तज्ज्ञांच्या मते, इराणकडून असलेला धोका पूर्णपणे कमी होईपर्यंत या सामुद्रधुनीत परिस्थिती पूर्ववत होणे कठीण आहे. तसेच, या संकटाचे कायमस्वरूपी समाधान लष्करी कारवाईतून नव्हे, तर चर्चा आणि राजकीय तोडग्यातूनच शक्य असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले आहे.

हेही वाचा