युद्धाचा परिणाम: भारतातील नायरा एनर्जीचे पेट्रोल ५.३० रुपये; तर डिझेल ३ रुपयांनी महाग

Story: वेब डेस्क। गोवन वार्ता |
26th March, 04:35 pm
युद्धाचा परिणाम: भारतातील नायरा एनर्जीचे पेट्रोल ५.३० रुपये; तर डिझेल ३ रुपयांनी महाग

नवी दिल्ली (New Delhi) : पश्चिम आशियात (Western Asia)  सुरू असलेल्या इराण-अमेरिका (Iran-USA) संघर्षामुळे जागतिक ऊर्जा पुरवठ्यावर मोठा परिणाम झाला आहे.  त्याचा थेट फटका भारतातील (India)  इंधन दरांना बसू लागला आहे. देशातील सर्वात मोठ्या खासगी इंधन विक्रेत्यांपैकी एक असलेल्या नायरा एनर्जी (Nayara Energy) कंपनीने पेट्रोलच्या दरात प्रतिलिटर ५.३० पये तर डिझेलच्या दरात ३ रुपयांपर्यंत वाढ केली आहे.  

गेल्या जवळपास महिनाभर सुरू असलेल्या युद्धामुळे होर्मुझ सामुद्रधुनीतील (Strait of Hormuz)  वाहतूक मोठ्या प्रमाणावर विस्कळीत झाली आहे. तसेच अमेरिका आणि इराणकडून ऊर्जा प्रकल्पांवर झालेल्या हल्ल्यांमुळे जागतिक पुरवठा साखळीवर ताण निर्माण झाला आहे. परिणामी, भारतातही पेट्रोल-डिझेलच्या दरात वाढ झाली आहे.

सूत्रांच्या माहितीनुसार, नायरा एनर्जीकडे देशातील सुमारे ६,९६७ पेट्रोल पंप आहेत. वाढत्या कच्च्या मालाच्या खर्चाचा काही भार ग्राहकांवर टाकण्याचा निर्णय कंपनीने घेतला आहे. राज्यनिहाय कररचनेनुसार दरवाढीचा परिणाम वेगवेगळा दिसून येत आहे.

दरम्यान, इंधनटंचाईच्या भीतीने देशातील अनेक भागांत नागरिक पेट्रोल पंपांवर गर्दी करत असल्याचे चित्र आहे. काही ठिकाणी एलपीजी गॅससाठीही लांबच लांब रांगा लागल्या आहेत.

महत्त्वाच्या शहरांतील पेट्रोल दर (रुपये/लिटर):

हैदराबाद  : १०७.४६ 

कोलकाता : १०५.४१

मुंबई   :   १०३.५४

बेंगळुरू :   १०२.९२ 

भुवनेश्वर : १०१.१९

चेन्नई :      १००.८० 

डिझेल दर (रुपये/लिटर):

हैदराबाद : ९५.७० 

भुवनेश्वर : ९२.७७

चेन्नई :     ९२.३९ 

कोलकाता : ९२.०२

बेंगळुरू :     ९०.९९

मुंबई :        ९०.०३

दरम्यान, सरकारकडून इंधन टंचाई नसल्याचे आश्वासन देण्यात आले असले तरी सोशल मीडियावर पसरलेल्या अफवांमुळे काही राज्यांत घबराटीचे वातावरण निर्माण झाले आहे.



हेही वाचा