तारीमळ-सांगे येथे सर्व्हिस रोड नसल्यामुळे पुलाचे बांधकाम रोखले

सोमवारी अधिकारी देणार भेट : समाधानकारक तोडगा निघेपर्यंत काम बंद ठेवण्याचा निर्धार

Story: प्रतिनिधी। गोवन वार्ता |
27th March, 11:19 pm
तारीमळ-सांगे येथे सर्व्हिस रोड नसल्यामुळे पुलाचे बांधकाम रोखले

सांगे : तारीमळ-सांगे प्रभागातील बेंडवाडा पुलाच्या कामावरून सोमवारी परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले. नवीन पुलाचे काम सुरू असताना तारीमळवासीयांसाठी योग्य सर्व्हिस रोडची तरतूद न केल्याने, सुमारे दोनशेहून अधिक महिला-पुरुषांनी एकत्र येत पुलाचे काम बंद पाडले.
बेंडवाडा येथे नवीन पुलाचे बांधकाम सुरू आहे. तारीमळ येथील रहिवाशांना ये-जा करण्यासाठी ५ मीटर रुंदीचा सर्व्हिस रोड तयार करण्याचे आश्वासन देण्यात आले होते. मात्र, हा रस्ता तयार करताना केवळ मातीवर काँक्रीट टाकले जात असल्याचे निदर्शनास आल्यानंतर ग्रामस्थांचा संताप अनावर झाला. जोपर्यंत रस्त्याचा प्रश्न समाधानकारकपणे सुटत नाही, तोपर्यंत काम सुरू करू देणार नसल्याचा पवित्रा ग्रामस्थांनी घेतला.
घटनेची माहिती मिळताच सांगेचे मामलेदार सिद्धार्थ प्रभू आणि पोलीस निरीक्षक धितेंद्र नाईक तातडीने घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी परिस्थिती हाताळून ग्रामस्थांशी चर्चा केली. यावेळी नगरसेवक केरोज क्रूझ यांनी संबंधित अभियंता निलय शेणवी यांच्याशी फोनवरून संपर्क साधला. अभियंत्यांनी सोमवारी सकाळी १०.३० वाजता इतर वरिष्ठ अधिकाऱ्यांसह घटनास्थळी भेट देऊन चर्चा करण्याचे आश्वासन दिले आहे.
रस्ता निकृष्ट दर्जाचा : नगरसेवक रुमाल्डो
नगरसेवक रुमाल्डो फेर्नांडिस यांनीही घटनास्थळी उपस्थित राहून ग्रामस्थांना पाठिंबा दर्शवला. तारीमळ गावात जाण्यासाठी सध्या तयार करण्यात आलेला कच्चा रस्ता अत्यंत निकृष्ट दर्जाचा असल्याची माहिती त्यांनी दिली. अधिकारी सोमवारी सकाळी प्रत्यक्ष पाहणी करून कोणता मार्ग काढतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. तोपर्यंत पुलाचे काम बंद ठेवण्याचे आश्वासन प्रशासनाकडून देण्यात आले असून, तोडगा निघाल्याशिवाय ग्रामस्थ मागे हटणार नाही, असे सांगण्यात आले.

हेही वाचा