कुडचडे प्रकरणाबाबत महिला आणि बाल आयोगाने कठोर भूमिका घ्यावी : काँग्रेस

Story: प्रतिनिधी | गोवन वार्ता |
28th March, 03:13 pm
कुडचडे प्रकरणाबाबत महिला आणि बाल आयोगाने कठोर भूमिका घ्यावी : काँग्रेस

पणजी : कुडचडे लैंगिक अत्याचार प्रकरणाची व्याप्ती वाढत असतानाही महिला तसेच बाल आयोगाने अद्याप कोणतीही ठोस भूमिका घेतलेली नाही. या प्रकरणी दोन्ही आयोगांनी कठोर पावले उचलणे आवश्यक आहे. या प्रकरणातील पीडिता मोठ्या मानसिक धक्क्यातून जात असून, शिक्षण खात्याने त्यांचे तातडीने समुपदेशन करावे, अशी मागणी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अमित पाटकर यांनी केली. शनिवारी महिला काँग्रेसतर्फे आयोजित मोर्चात ते बोलत होते. यावेळी प्रतीक्षा खलप व अन्य पदाधिकारी उपस्थित होते.

पाटकर पुढे म्हणाले की, भाजप सरकार कुडचडे प्रकरण दाबण्याचा प्रयत्न करत आहे. सुरुवातीला पोलीस आरोपीला अटक करण्यास टाळाटाळ करत होते, मात्र स्थानिकांनी दबाव आणल्यानंतरच त्याला अटक करण्यात आली. आतापर्यंत पाच ते सहा पीडितांनी तक्रारी केल्या असून, ही संख्या १०० वर असण्याची शक्यता आहे. पोलिसांनी सरकारच्या हातातील बाहुले न बनता निष्पक्ष तपास करावा. राज्यातील महिला व मुलींना सुरक्षा देण्यात भाजप सरकार पूर्णपणे अपयशी ठरले आहे.

आरोपीचे वडील भाजपचे नगरसेवक असूनही माजी प्रदेशाध्यक्ष विनय तेंडुलकर ते भाजपचे सदस्य नसल्याचे सांगत आहेत, असे पाटकर यांनी नमूद केले. आरोपी आणि त्याच्या वडिलांचे भाजपच्या आजी-माजी प्रदेशाध्यक्षांसोबतचे फोटो उपलब्ध आहेत. राज्यात दररोज सरासरी नऊ अत्याचार प्रकरणांची नोंद होत असून, पर्यटनासाठी ओळखल्या जाणाऱ्या गोव्याची प्रतिमा आता 'गुन्ह्यांची राजधानी' अशी होत आहे, अशी टीकाही त्यांनी केली.

 नगरसेवकांना तत्काळ पदावरून हटवावे

प्रतिक्षा खलप म्हणाल्या की, भाजप प्रदेशाध्यक्ष दामू नाईक हे सुशांत नाईक यांना वाचवण्याचा प्रयत्न करत आहेत. नगरसेवक पदाचा कार्यकाळ संपत आला असला, तरी भाजपने सुशांत यांना तत्काळ पदावरून हटवणे आवश्यक आहे.

हेही वाचा