गोव्यात तीन दिवस तुरळक पावसाची शक्यता

३४ अंशांच्या पार गेलेले तापमान पावसाच्या शिडकाव्याने काहीसे खाली येण्याची चिन्हे

Story: प्रतिनिधी | गोवन वार्ता |
28th March, 03:25 pm
गोव्यात तीन दिवस तुरळक पावसाची शक्यता

पणजी : कर्नाटक आणि महाराष्ट्र दरम्यान तयार झालेला 'ट्रफ' (Trough), पूर्वेकडून वाहणारे वारे व वातावरणीय बदलांमुळे राज्यात ३०, ३१ मार्च आणि १ एप्रिल रोजी पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्याने व्यक्त केली आहे. दरम्यान, २९ मार्च रोजी राज्यातील वातावरण कोरडे राहण्याची शक्यता आहे.

शनिवारी राज्यात काही ठिकाणी ढगाळ वातावरण होते. कमाल आणि किमान तापमानातील वाढ कायम असल्याने उकाडा जाणवत होता. शनिवारी पणजीत कमाल ३४.६ अंश तर किमान २५.५ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. मुरगावमधील कमाल तापमान ३४.४ अंश व किमान तापमान २५.६ अंश सेल्सिअस राहिले. पुढील सहा दिवस राज्यातील कमाल तापमान ३३ ते ३४ अंश, तर किमान तापमान २४ ते २५ अंश सेल्सिअसपर्यंत राहण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. मागील काही दिवसांत राज्यातील काही भागांत ढगाळ वातावरण होते, तर सत्तरी तालुक्यात काही ठिकाणी वादळी वाऱ्यासह पावसाची नोंद झाली होती.

याआधी खात्याने मार्च, एप्रिल आणि मे या तीन महिन्यांच्या कालावधीत गोव्यातील कमाल आणि किमान तापमान सरासरीपेक्षा अधिक राहण्याची शक्यता व्यक्त केली आहे. यादरम्यान राज्यात उष्णतेच्या लाटेची शक्यता नसल्याचे खात्याने स्पष्ट केले होते. वरील कालावधीत राज्यात सरासरीएवढा किंवा त्याहून किंचित कमी पाऊस पडण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. यापूर्वी खात्याने १७ आणि १८ मार्च रोजी पावसाचा 'यलो अलर्ट' जारी केला होता, मात्र तेव्हा पावसाची नोंद झाली नाही.

हेही वाचा