बार्देशमध्ये दोन खुनाच्या घटनांनी खळबळ; कळंगुट येथे गुजरातच्या युवकाचा खून

म्हापसा येथे अज्ञाताचा खून

Story: प्रतिनिधी।गोवन वार्ता |
28th March, 05:22 pm
बार्देशमध्ये दोन खुनाच्या घटनांनी खळबळ; कळंगुट येथे गुजरातच्या युवकाचा  खून

म्हापसा : गोव्यातील (Goa) बार्देशमध्ये (Bardez) दोन खुनांच्या घटनांनी खळबळ माजली आहे. तिवायवाडा, कळंगुट (Calangute) येथे कॅसिनोमधील वादातून मित्रांनी गुजरात येथील एका युवकाचा निर्घृणरित्या खून केला. म्हापसा (Mapusa) येथे एका अज्ञाताचा संशयास्पद स्थितीत शेतीत मृतदेह सापडला आहे. अंगावर जखमा असून, पोलीस खुनाच्या नजरेतून तपास करीत आहेत.   

 कॅसिनोमध्ये जुगार खेळण्यासाठी आलेल्या सुरत, गुजरात मधील राजभर रविनारायण रामदर्शनभाई (२७) या युवकाचा त्याच्याच सहकारी मित्रांनी निर्घृणरित्या खून केला. कॅसिनोमधील आर्थिक वादातून हा खुनाचा प्रकार घडल्याचा प्राथमिक अंदाज असून; फरार संशयितांचा शोध पोलीस घेत आहेत. 

तिवायवाडा, कळंगुट येथील खुनाची घटना शनिवारी, सकाळी ६ च्या सुमारास येथील रिसॉर्ट सांता मोनिकामध्ये घडली. सुरत, गुजरात मधील पर्यटकांचा एक गट कळंगुटमध्ये आला होता. हा गट तिवायवाडा येथील कासा दी कॅसिनो या ‘ऑफ-शोर’ कॅसिनोमध्ये उतरला होता. त्यांनी चार खोल्या आरक्षित केल्या होत्या.

शनिवारी २८ रोजी पहाटे कॅसिनो जुगारातील आर्थिक व्यवहारावरून या पर्यटक गटातील चार जणांमध्ये जोरदार भांडण झाले. वादाचे रूपांतर हाणामारीत झाले. तीन मित्रांनी मयत राजभर  याच्यावर सूरी हल्ला चढवला व त्याला मारझोड केली. मयत राजभर हा स्वतःचा जीव वाचवण्यासाठी रक्तबंबाळ अवस्थेत कॅसिनो हॉटेलमधून बाहेर पडला आणि तो समोरील एका सांता मोनिका रिसॉर्टमध्ये आश्रय घेण्यासाठी धावला. मात्र,  मित्रांनी त्याचा पाठलाग केला आणि रिसॉर्टच्या स्विमिंग पूलजवळ त्याला पकडले व एकाने रागाच्या भरात त्याच्या पोटावर सुरीचे सपासप वार केले. रक्ताच्या थारोळ्यात कोसळलेल्या मयताचा जागीच मृत्यू झाला.

संशयितांनी खुनासाठी वापरलेली सुरी स्विमिंग पूलमध्येच फेकून दिली आणि घटनास्थळावरून पळ काढला. घटनेची माहिती मिळताच कळंगुट पोलीस निरीक्षक लक्षी आमोणकर यांनी सहकारी पोलिसांसह घटनास्थळी धाव घेतली व पंचनामा केला. पोलीस अधीक्षक हरीशचंद्र मडकईकर, विश्वेश कर्पे यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. श्वान पथक आणि ठसे तज्ञांची पाचारण करण्यात आले. नंतर मृतदेह शवविच्छेदनासाठी बांबोळी येथील गोमेकॉत पाठवला आहे. 

स्विमिंग पूलमधून सूरी जप्त 

 दरम्यान, संशयितांनी गुन्ह्यात वापरलेली सूरी पोलिसांनी स्विमिंग पूलमधून जप्त केली आहे. सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे पोलीस संशयितांचा शोध घेत आहेत.

म्हापशात अज्ञाताच खून

दरम्यान,  बोडगिणी, म्हापसा येथे मरड बाजूने शेत जमिनीत एका अज्ञात इसमाचा संशयास्पदरित्या मृतदेह सापडला आहे. मयताचा एक कापलेला कान गायब असून; पोलीस याप्रकरणी खूनाच्या नजरेतून तपास करीत आहेत.

 ही घटना शनिवारी सकाळी ८ च्या सुमारास उघडकीस आली. बोडगिणी येथे मरडच्या बाजूने जाणाऱ्या रस्त्याच्या बाजूला काही अंतरावर शेत जमिनीमध्ये एका व्यक्तीचा मृतदेह असल्याची माहिती पोलिसांना मिळाली.  माहिती मिळताच म्हापसा पोलीस निरीक्षक नवीन देसाई यांनी आपल्या सहकाऱ्यांसह घटनास्थळी धाव घेतली व पंचनामा केला. 

मयताच्या चेहऱ्यावर काही जखमा होत्या तसेच मयताचा एक कान गायब होता. हा कान कापला गेल्याच्या खुणा तपासणीवेळी आढळून आल्या. पोलिसांनी पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी गोमेकॉत पाठवून दिला असून; या प्रकरणी पोलीस पुढील तपास करीत आहेत.




हेही वाचा