दक्षिण गोवा जिल्हा प्रशासनाकडून नियमावली जारी

मडगाव: राज्यात तापमानाचा पारा सातत्याने वाढत असल्याने दक्षिण गोव्याच्या जिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्षा एग्ना क्लिटस यांनी नागरिकांच्या आरोग्याच्या सुरक्षिततेसाठी मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. उष्माघाताचा धोका टाळण्यासाठी नागरिकांनी योग्य ती खबरदारी घेण्याचे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.
प्रशासनाने जारी केलेल्या महत्त्वाच्या सूचना:
* पाण्याचे सेवन: तहान लागलेली नसली तरीही वारंवार पाणी प्यावे. स्वतःला हायड्रेटेड ठेवण्यासाठी ओआरएस (ORS), लस्सी, नारळ पाणी, लिंबू पाणी किंवा ताकाचे सेवन करावे.
* पेहराव: हलके, पातळ आणि सुती कपडे वापरावेत. बाहेर जाताना गॉगल, छत्री किंवा टोपीचा वापर करावा.
* प्रवास: प्रवास करताना नेहमी सोबत पाण्याची बाटली ठेवावी. उन्हात काम करावे लागत असल्यास डोके आणि मान ओल्या कपड्याने झाकून ठेवावी.
* प्राणी-पक्षांची काळजी: पाळीव प्राण्यांना सावलीत बांधावे आणि त्यांना पुरेसे पाणी द्यावे. पक्षांसाठी गच्चीवर किंवा बाल्कनीत पाण्याच्या कुंड्या ठेवाव्यात.
* आरोग्य: अस्वस्थ वाटल्यास किंवा चक्कर आल्यास त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.
या गोष्टी प्रकर्षाने टाळा:
* दुपारी १२ ते ३ या वेळेत उन्हात बाहेर जाणे टाळावे.
* बंद किंवा पार्क केलेल्या वाहनात लहान मुले किंवा पाळीव प्राण्यांना सोडू नये.
* गडद रंगाचे आणि घट्ट कपडे घालणे टाळावे.
* मद्यपान, चहा, कॉफी आणि कार्बोनेटेड पेये (Cold Drinks) टाळावीत, कारण यामुळे शरीरातील पाण्याचे प्रमाण कमी होते.
* जास्त प्रथिने असलेले तसेच शिळे अन्न खाणे टाळावे.
* उष्माघातामुळे गंभीर आरोग्य समस्या निर्माण होऊ शकतात, त्यामुळे वेळेवर घेतलेली खबरदारी आणि सतर्कता आपल्याला सुरक्षित ठेवू शकते, असे प्रशासनाने या नोटिशीत नमूद केले आहे.