गोव्यात २०३५ पर्यंत कचऱ्यात २५ टक्के वाढ होण्याची शक्यता

Story: प्रतिनिधी।गोवन वार्ता |
01st April, 05:01 pm
गोव्यात २०३५ पर्यंत कचऱ्यात २५ टक्के वाढ होण्याची शक्यता

पणजीः पुढील १० वर्षांत गोव्यात (Goa) कचऱ्यात (Garbage) २५ टक्के एवढी वाढ होणार आहे. राज्याच्या घन कचरा व्यवस्थापन  धोरणातून जारी केलेल्या आकडेवारीनुसार २०३५ पर्यंत गोवा राज्य दर दिवशी १,१०० टनापेक्षा जास्त कचरा निर्माण करण्याच्या मार्गावर आहे. सर्वात मोठे कचरा संकट हे बार्देश तालुक्यात होण्याची शक्यता आहे. 

घन कचरा व्यवस्थापन महामंडळाने (Solid waste management corporation)  तयार केलेल्या धोरणामध्ये कचऱ्याचे प्रमाणीकरण आणि लक्षणीकरण अहवाल (Report)  जारी केला आहे. अहवालात दिलेल्या आकडेवारीनुसार २०२५ मध्ये दर दिवशी ८८७.६१ टीपीडी कचरा एकत्र होणार. आता भविष्यात २०३० पर्यंत कचरा एकत्र होण्याची आकडेवारी ९९२.६७ टीपीडी पर्यंत होण्याची शक्यता आहे, तर २०३५ पर्यंत कचरा एकत्र होण्याची आकडेवारी १,१०७.८० टीपीडी एवढा कचरा एकत्र होण्याची शक्यता आहे. येत्या दहा वर्षांत राज्यभरातील कचऱ्यात दर दिवशी २२० टनांची वाढ होण्याचा अंदाज आहे. 

या अहवालात ‘बार्देश’ तालुका कचऱ्याच्या समस्येचे प्रमुख केंद्र म्हणून पुढे आले आहे. बार्देशात कचऱ्याचे प्रमाण सर्वात जास्त आहे. आणि २०२५ वर्षी २२७.४० टीपीडी कचऱ्यावरून २०३५ पर्यंत हा कचरा २८४.८२ टीपीडी पर्यंत पोहोचणार.  

पर्यटन आणि शहरीकरण या घटकांमुळे हा वाढीचा अंदाज काढण्यात आला आहे. २०३५ पर्यंत केवळ कळंगुट समुद्रकिनारी दर दिवशी ५४.५७ टीपीडी कचरा निर्माण होणार. जो म्हापसा सारख्या पालिका परिसरातील ५६.७२ टीपीडी कचऱ्याच्या प्रमाणा एवढा आहे. 

राजधानी पणजीत २०३५ पर्यंत ५७.२३ टीपीडी एवढा कचरा निर्माण होणार. तर फोंडा आणि सत्तरी तालुक्यात येत्या १० वर्षांनी कचऱ्यात २६ टक्के वाढ होण्याचा अंदाज आहे. 

पर्यटन आणि शहरीकरणामुळे बार्देश आणि सासष्टी हे तालुके कचरा निर्मितीत आघाडीवर आहेत. धारबांदोडा तालुक्यात कचऱ्याचे प्रमाण सर्वात कमी आहे. पण वाढीची टक्केवारी २८.४ टक्के इतर तालुक्यांच्या तुलनेत जास्त आहे. म्हापसा, पणजी आणि मडगाव सारख्या शहरात कचऱ्याचा ताण २०३५ पर्यंत खूप वाढण्याची शक्यता आहे. 

गोव्यातील तालुक्याप्रमाणे कचरा निर्म‌ितीचा अंदाज 

(आकडेवारी: टन दर दिवशी - टीपीडी)

तालुका     २०२५    २०३० अंदाज     २०३५ अंदाज     वाढीची टक्केवारी (२०२५- २०३५)


बार्देश     २२७.४०    २५४.७९          २८४.८२           २५.२%

  

सासष्टी   १७३.५२    १९४.७२          २१७.९८           २५.६%


तिसवाडी  १२५.१५    १३८.५०          १५३.०८           २२.३%


फोंडा      ७८.२८     ८७.९६           ९८.५८           २५.९%


मुरगाव    ७१.९३     ७९.५४           ८७.८९           २२.२%

  

डिचोली    ४३.३१     ४८.३७           ५३.९१           २४.५%


पेडणे      ४०.१९    ४४.३२            ४८.८२           २१.५%

 

केपे      ३५.१५     ३९.४६            ४४.२४           २५.८%


सत्तरी     २५.९०    २९.०८            ३२.५७           २५.८%


काणकोण  २१.१२   २३.४०             २५.८८           २२.५%


सांगे     १६.५१    १८.५७             २०.८८           २६.४%


धारबांदोडा  ९.१५   १०.३६             ११.७५            २८.४%






हेही वाचा