इराणमधील युद्ध दोन-तीन आठवड्यांत संपणार; राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे मोठे विधान

अमेरिकेचे उद्दिष्ट पूर्ण झाल्याचा दावा; इराणमधील सत्तापालटानंतर आता माघारीचे स्पष्ट संकेत

Story: वेब डेस्क । गोवन वार्ता |
01st April, 05:42 pm
इराणमधील युद्ध दोन-तीन आठवड्यांत संपणार; राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे मोठे विधान

वॉशिंग्टन: गेल्या काही काळापासून संपूर्ण जगाला चिंतेत टाकणारे अमेरिका आणि इराणमधील युद्ध आता अंतिम टप्प्यात पोहोचल्याचे संकेत मिळत आहेत. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी अत्यंत महत्त्वपूर्ण विधान करत, हे युद्ध पुढील दोन ते तीन आठवड्यांत संपुष्टात येऊ शकते, असा दावा केला आहे. अमेरिकेने इस्रायलच्या सोबतीने इराणविरुद्ध सुरू केलेल्या लष्करी कारवाईचे मुख्य उद्दिष्ट साध्य झाले असून, आता अमेरिका लवकरच तिथून माघार घेण्याच्या तयारीत आहे. या पार्श्वभूमीवर ट्रम्प बुधवारी रात्री देशाला संबोधित करणार असून, त्यात युद्धाच्या समाप्तीबाबत अधिकृत आणि मोठी घोषणा होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी स्पष्ट केले की, इराणची अणू शस्त्रे बनवण्याची क्षमता नष्ट करणे हे अमेरिकेचे सर्वात मोठे लक्ष्य होते आणि ते आता पूर्ण झाले आहे. त्यांच्या दाव्यानुसार, इराणच्या हवाई क्षेत्रावर आता अमेरिकेचे पूर्ण वर्चस्व असून, तिथल्या अनेक कट्टरपंथी राजकीय आणि लष्करी नेत्यांचा खात्मा करण्यात यश आले आहे. या कारवाईमुळे इराणमध्ये सत्तापालट झाला असून, नवीन नेतृत्व हे पूर्वीच्या तुलनेत अधिक तर्कसंगत आणि कमी कट्टरपंथी असल्याचे ट्रम्प यांनी नमूद केले आहे. त्यामुळे आता तिथे अधिक काळ थांबण्याची गरज अमेरिकेला वाटत नाही. 'आम्ही आमचे काम पूर्ण करत आहोत आणि सर्व काही ठरल्याप्रमाणे झाल्यास पुढील १५ दिवसांत आमची फौज तिथून बाहेर पडेल,' असे संकेत त्यांनी दिले आहेत.

विशेष म्हणजे, हे युद्ध थांबवण्यासाठी इराणसोबत कोणताही औपचारिक करार करण्याची अमेरिकेला आवश्यकता वाटत नाही. होर्मुझची सामुद्रधुनी सुरक्षित ठेवणे ही केवळ अमेरिकेची जबाबदारी नसल्याचे सांगत ट्रम्प यांनी मित्रराष्ट्रांच्या भूमिकेवरही कडक शब्दांत टीका केली आहे. इराणने प्रत्युत्तरादाखल तेल वाहतुकीसाठी महत्त्वाचा असलेला हा मार्ग रोखला असला, तरी ट्रम्प यांनी त्याकडे फारसे गांभीर्याने न पाहता, अमेरिकेची माघार ही कोणत्याही अटीवर अवलंबून नसेल असे स्पष्ट केले. "इराणला अमेरिकेशी कोणताही करार करण्याची गरज नाही, जेव्हा आम्हाला वाटेल की ते दीर्घकाळासाठी 'पाषाण युगात' गेले आहेत आणि अणू शस्त्रे बनवू शकणार नाहीत, तेव्हा आम्ही तिथून निघून जाऊ, असे रोकठोक विधान ट्रम्प यांनी केले आहे.

युद्धाच्या पार्श्वभूमीवर जागतिक स्तरावर इंधनाचे दर गगनाला भिडले आहेत, याचा फटका अमेरिकेलाही बसत आहे. यावर भाष्य करताना ट्रम्प म्हणाले की, इंधनाचे दर खाली आणण्यासाठी अमेरिकेने इराणमधून बाहेर पडणे हाच एकमेव मार्ग आहे. एकदा का अमेरिकन सैन्य तिथून बाहेर पडले की तेलाच्या किमतीत मोठी घसरण होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे. दुसरीकडे, चीन आणि पाकिस्तानने या संघर्षावर तोडगा काढण्यासाठी पाच कलमी शांतता प्रस्ताव मांडला आहे. मात्र, ट्रम्प यांची आक्रमक आणि तटस्थ भूमिका पाहता, अमेरिका स्वतःच्या अटींवरच हे युद्ध थांबवण्याच्या मनस्थितीत असल्याचे दिसून येत आहे. आज रात्री होणाऱ्या त्यांच्या भाषणाकडे आता संपूर्ण जगाचे लक्ष लागले असून, पश्चिम आशियातील तणाव निवळणार की नाही, याचा फैसला लवकरच होणार आहे.

हेही वाचा