पश्चिम आशियात तणाव शिगेला

तेहरान/वॉशिंग्टन : पश्चिम आशियातील युद्धजन्य परिस्थिती अधिक तीव्र होत असून, अमेरिकेचे (USA) राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) यांनी इराणला ‘‘अश्मयुगात’ (Stone age) परत पाठवू” अशी कठोर धमकी दिल्यानंतर तणाव अधिक वाढला आहे. याला प्रत्युत्तर देत इराणने (Iran) इस्रायलवर (Israel) क्षेपणास्त्रांचा मारा सुरूच ठेवला असून “हल्ले सुरू राहिले, तर आम्हीही ठामपणे लढा देऊ,” असा इशारा दिला आहे.
अमेरिकेचा युद्ध समाप्तीचा दावा
राष्ट्राला उद्देशून केलेल्या भाषणात डोनाल्ड ट्रम्प यांनी अमेरिका युद्धातील उद्दिष्टांच्या जवळ पोहोचल्याचा दावा केला. तसेच इराणवर अधिक तीव्र हल्ले करण्याचा इशारा देत परिस्थिती आणखी चिघळण्याची शक्यता निर्माण केली आहे.
लढा सुरूच राहील : इराण
इराणच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते इस्माईल बघाई यांनी स्पष्ट केले की, “अमेरिका-इस्रायलचे हल्ले सुरू असतील, तोपर्यंत इराण लढा थांबवणार नाही.” त्यांनी युद्ध, चर्चा आणि युद्धविरामाच्या दुष्टचक्राला इराण सहन करणार नसल्याचेही ठामपणे सांगितले.
गल्फ देशांवरही हल्ले
इराणच्या इस्लामीक रेव्होल्युशनरी गार्ड कोर्प्सने (Islamic Revolutionary Guard Corps (IRGC) गल्फ प्रदेशातील अमेरिकेशी संबंधित औद्योगिक प्रकल्पांवर हल्ले केल्याचा दावा केला आहे. अबूधाबी (यूएई) येथील स्टील प्रकल्प आणि बहरीनमधील अॅल्युमिनियम उद्योगांना लक्ष्य करण्यात आल्याचे सांगितले जात आहे.
आयआरजीसीने इशारा दिला की, “इराणच्या उद्योगांवर पुन्हा हल्ले झाले, तर पुढील प्रत्युत्तर अधिक भीषण असेल आणि अमेरिकन आर्थिक पायाभूत सुविधांनाही लक्ष्य केले जाईल.”
वैद्यकीय केंद्राचे नुकसान; माजी परराष्ट्रमंत्री जखमी
इराणच्या आरोग्य मंत्रालयानुसार, शंभर वर्षांहून अधिक जुने वैद्यकीय संशोधन केंद्र गंभीररीत्या नुकसानग्रस्त झाले आहे. तसेच माजी परराष्ट्रमंत्री कमाल खराझी (Kamal Kharazi) हे तेहरानमधील हल्ल्यात गंभीर जखमी झाल्याची माहिती समोर आली आहे.
परिस्थिती अधिक धोकादायक
इराण-इस्रायल-अमेरिका यांच्यातील वाढत्या संघर्षामुळे संपूर्ण पश्चिम आशियात युद्धाचे सावट गडद झाले आहे. जागतिक स्तरावर चिंता व्यक्त केली जात आहे. पुढील काही दिवस परिस्थिती अधिक गंभीर होण्याची शक्यता तज्ज्ञांकडून वर्तवली जात आहे.