ब्रेंट क्रूडचा दर प्रति बॅरल १०८ डॉलरपर्यंत

वॉशिंग्टन : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) यांनी इराणवर अधिक तीव्र हल्ल्यांचा इशारा दिल्यानंतर गुरुवारी आंतरराष्ट्रीय बाजारात (International Market) कच्च्या तेलाच्या (Crude Oil) किमतींमध्ये तब्बल ७ टक्क्यांनी वाढ झाली. या घडामोडींमुळे जागतिक अर्थव्यवस्थेत अस्थिरता निर्माण झाली आहे. युरोप (Europe) आणि आशियातील शेअर बाजारात घसरण नोंदवण्यात आली.
ट्रम्प यांनी व्हाइट हाऊसमधून केलेल्या संबोधनात पुढील दोन ते तीन आठवड्यांत इराणवर (Iran) कठोर हल्ले करण्याचा इशारा देत “युद्धाची उद्दिष्टे लवकरच पूर्ण करू” असा दावा केला. मात्र युद्ध समाप्तीबाबत कोणताही ठोस आराखडा त्यांनी मांडला नाही. यामुळे बाजारातील अनिश्चितता अधिक वाढली आहे.
ब्रेंट क्रूडचा दर प्रति बॅरल १०८ डॉलरपर्यंत
दरम्यान, ब्रेंट क्रूडचा दर प्रति बॅरल १०८ डॉलरपर्यंत पोहोचला, तर वेस्ट टेक्सास इंटरमिजिएट (WTI) तेलाचा दर सुमारे १०६.५० डॉलरपर्यंत गेला. ट्रम्प यांच्या भाषणापूर्वी तेलाचे दर १०० डॉलरखाली घसरले होते. कारण युद्ध संपुष्टात येण्याबाबत सकारात्मक संकेत मिळतील, अशी अपेक्षा होती. मात्र भाषणानंतर उलट परिस्थिती निर्माण झाली.
इराण युद्धामुळे जागतिक तेल व वायू पुरवठा साखळीवर गंभीर परिणाम झाला आहे. विशेषतः होर्मुझ सामुद्रधुनी (Strait of Hormuz) या महत्त्वाच्या जलमार्गातून होणारी तेलवाहतूक जवळपास ठप्प झाली आहे. अमेरिकन-इस्रायली हल्ल्यांच्या प्रत्युत्तरात इराणने टँकरवर हल्ल्याचा इशारा दिल्यानंतर अनेक देशांनी या मार्गाचा वापर थांबवला आहे.
ट्रम्प यांनी आपल्या भाषणात अमेरिकेला मध्यपूर्वेतील उर्जेवर अवलंबून राहण्याची गरज नसल्याचे सांगत इतर देशांनी पुढाकार घेऊन या मार्गावरील वाहतूक सुरळीत करावी, असे आवाहन केले. युद्ध संपल्यानंतर हा जलमार्ग आपोआप खुला होईल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
होर्मुझ सामुद्रधुनी अडकली
ऊर्जा तज्ज्ञ अल्बर्टो बेलोरिन यांच्या मते, “तत्काळ युद्धविरामाच्या आशेवर पाणी फेरले गेले असून, तेलाच्या किमतीतील वाढ ही बाजारातील वास्तव परिस्थितीचे प्रतिबिंब आहे.” त्यांनी पुढे सांगितले की, होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा पूर्ण क्षमतेने सुरू होण्यासाठी आता काही आठवडे नव्हे तर महिने लागू शकतात.
या सर्व पार्श्वभूमीवर, जागतिक ऊर्जा बाजारातील अस्थिरता वाढण्याची शक्यता असून, आगामी काळात तेलाच्या किमतींमध्ये आणखी चढ-उतार होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.