मोहिमेचा समारोप : ४० वर्षांवरील महिलांची मोफत आरोग्य तपासणी

प्रतिनिधी। गोवन वार्ता
पणजी : राज्य सरकारने सुरू केलेल्या ‘चेक्ड बाय दोतोर’ या मोहिमेला राज्यभरातून चांगला प्रतिसाद मिळाला. उपक्रमांतर्गत ८ ते ३१ मार्च दरम्यान ३७ हजार २९५ महिलांची तपासणी करण्यात आली. यामध्ये महिलांना ११ विविध प्रकारच्या आजारांसाठी तपासण्यात आले. तर काही महिलांना औषधे, लस देण्यात आले. राज्य सरकारने जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने ८ मार्च रोजी ही मोहीम सुरू केली होती. यामध्ये ४० वर्षांवरील महिलांची मोफत आरोग्य तपासणी करण्यात आली.
मिळालेल्या माहितीनुसार, मोहिमेत उच्च रक्तदाबासाठी २७,०२३ महिलांची चाचणी करण्यात आली. मधुमेहासाठी २३,०३६, स्तनांच्या कर्करोगासाठी ११,३४७, तोंडाच्या कर्करोगासाठी १२,७९३, अॅनिमियासाठी १२,५६३, तर युरिन इन्फेक्शनसाठी ५,९४३ महिलांची तपासणी करण्यात आली. याशिवाय ३७९ महिलांना टीडी लस, तर १२० मुलींना एचपीव्ही लस देण्यात आली. २,४०९ महिलांना रक्तातील लोह वाढवण्यासाठी गोळ्या देण्यात आल्या. तर २,४९४ महिलांना कॅल्शियम गोळ्या देण्यात आल्या आहेत.
मोहिमेदरम्यान १,३९६ महिलांना सॅनिटरी पॅड देण्यात आले. ६,१२९ महिलांचे कुटुंब नियोजनासाठी समुपदेशन करण्यात आले. ३,११० गर्भवती आणि बाळाला जन्म दिलेल्या ५६९ महिलांची तपासणी करण्यात आली आहे. ९,६६३ महिलांनी आयुष ओपीडी सेवांचा लाभ घेतला. १,०९१ महिलांची पीएपीसाठीची तपासणी झाली. १३,२४० महिलांचे विविध विषयांसाठी समुपदेशन करण्यात आले. मोहिमेत दोन्ही जिल्हा इस्पितळ, प्राथमिक आणि सामुदायिक आरोग्य केंद्र आणि गोमेकॉमध्ये मोफत तपासणी करण्यात आली.
खासगी रुग्णालयांत अल्प दरात तपासण्या
मोहिमेत काही खासगी रुग्णालयांचाही समावेश करून घेण्यात आला होता. या रुग्णालयात सवलतीच्या दरात तपासण्या केल्या गेल्या. यासाठी प्रत्येक तालुक्यातील एका खासगी रुग्णालयाची निवड करण्यात आली होती. या मोहिमेअंतर्गत खासगी इस्पितळात अत्यंत अल्प दरात या तपासण्या करण्यात आल्या. महिला आपल्या आरोग्याकडे दुर्लक्ष करतात. त्यांनी वेळेत तपासणी करून भविष्यातील आजार टाळावेत यासाठी मोहीम सुरू करण्यात आली होती.
२,१४२ महिला अॅनिमिक
वरील कालावधीत राज्यातील २,१४२ महिलांना अॅनिमिया असल्याचे आढळून आले आहे. १,२४५ महिलांचे सँपल टीबीच्या अत्याधुनिक चाचणीसाठी पाठवण्यात आले आहे.