महत्त्वाचे दस्तावेज, पुरावे हस्तगत

प्रतिनिधी। गोवन वार्ता
पणजी : कुडचडे लैंगिक अत्याचारप्रकरणी गुन्हा शाखेच्या पथकाने कुडचडे येथील एका फ्लॅटचा पंचनामा केला. यावेळी गुन्हा शाखेने महत्त्वाचे दस्तावेज तसेच पुरावे हस्तगत केले आहेत.
कुडचडे लैंगिक अत्याचार प्रकरण समोर आल्यानंतर पोलिसांनी संशयित सोहम नाईक याला २२ मार्च रोजी अटक केली. त्याच्याविरोधात प्रथम दोघा अल्पवयीन मुलींनी तक्रार दाखल केली. त्यावरून कुडचडे पोलिसांनी सोहमविरोधात गोवा बाल कायदा आणि बाल लैंगिक शोषणविरोधी कायद्याअंतर्गत गुन्हे दाखल केले. या प्रकरणाचा तपास गुन्हे शाखेकडे वर्ग झाल्यानंतर एका १७ वर्षीय मुलीने सोहमविरोधात तक्रार दाखल केली. त्याची दखल घेऊन महिला पोलीस उपनिरीक्षक संध्या गुप्ता यांनी सोहमविरोधात पॉक्सो आणि गोवा बाल कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करून कारवाई सुरू केली आहे.
याच दरम्यान सोहमला दुसऱ्या गुन्ह्यात अटक केली. गुन्हा शाखेने शुक्रवारी कुडचडे येथील एका फ्लॅटचा पंचनामा केला. त्याच फ्लॅटमध्ये सोहमने अनेक मुलींवर लैंगिक अत्याचार केल्याचा दावा आहे. गुन्हा शाखेने महत्त्वाचे दस्तावेज व इतर पुरावे जप्त केले आहेत. या प्रकरणातील एका १९ वर्षीय मुलीने वैद्यकीय चाचणीला नकार दिला आहे. चार पीडितांची न्यायदंडाधिकाऱ्यांसमोर जबाब नोंदवणे प्रलंबित असल्याचे समोर आले आहे.