इराणने पाडले अमेरिकेचे सर्वांत प्रगत ‘एफ ३५’ फायटर जेट

इराणकडून कुवेतमध्ये ड्रोन हल्ले; तेल शुद्धीकरण प्रकल्प लक्ष्य


03rd April, 11:23 pm
इराणने पाडले अमेरिकेचे सर्वांत प्रगत ‘एफ ३५’ फायटर जेट

न्यूज डेस्क। गोवन वार्ता
तेहरान : इराण आणि अमेरिका यांच्यातील युद्ध आता टोकाच्या वळणावर पोहोचले आहे. इराणच्या लष्कराने मध्य इराणमधील मरकजी प्रांतात अमेरिकेचे सर्वांत प्रगत आणि अजेय ‘एफ-३५’ हे स्टेल्थ फायटर जेट पाडल्याचा खळबळजनक दावा केला आहे. विशेष म्हणजे, गेल्या १५ दिवसांत अमेरिकेचे दुसरे लढाऊ विमान पाडल्याचा हा इराणचा दावा आहे. या विमानाचे अवशेष मरकजी प्रांतात विखुरलेले असून, इराणने त्याचे फोटो प्रसिद्ध करून अमेरिकेला उघड आव्हान दिले आहे.
एका स्थानिक वृत्तवाहिनीने केलेल्या दाव्यानुसार, एका अमेरिकन लढाऊ वैमानिकाने आपल्या विमानातून बाहेर उडी मारली आणि नैऋत्य इराणमध्ये त्याचे विमान कोसळले. इराणने यापूर्वी वैमानिकाला पकडण्यात आल्याचा दावा केला होता; पण नंतर बक्षीस जाहीर केले. इराणने पाडलेल्या या विमानाच्या मलब्याची प्राथमिक तपासणी केली असता, त्यावर ब्रिटनमधील ‘लेकनहीथ एअर बेस’चे निशाण आढळले आहे. हा एअरबेस अमेरिकन वायुसेनेसाठी ब्रिटनमधील सर्वांत महत्त्वाचा तळ मानला जातो. यावरून हे विमान ब्रिटनमधून उड्डाण करून इराणच्या सीमेत घुसल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.
यापूर्वी १९ मार्च रोजी इराणने अमेरिकेचे ‘एफ-३५ए’ फायटर जेट पाडल्याचा दावा केला होता. त्यावेळी एक व्हिडिओही प्रसिद्ध करण्यात आला होता, मात्र अमेरिकेने तो दावा फेटाळला होता. यावेळी इराणने थेट विमानाचे तुकडे आणि फोटो जगासमोर ठेवल्याने अमेरिकेची कोंडी झाली आहे.
कुवैतच्या तेल शुद्धीकरण प्रकल्पांवर इराणचे हल्ले
आखाती देशांनाही युद्धाच्या झळा बसत आहेत. इराणकडून काही आखाती देशांतील तेल शुद्धीकरण प्रकल्पांनाही लक्ष्य केले जात आहे. कुवैतमध्ये शुक्रवारी पुन्हा ड्रोन हल्ले करण्यात आले. कुवेतची सरकारी वृत्तसंस्था कूनाने दिलेल्या अहवालानुसार, सरकारी तेल कंपनी ‘कुवैत पेट्रोलियम कॉर्पोरेशन’च्या मीना अल अहमदी तेल शुद्धीकरण प्रकल्पावर ड्रोनने हल्ला करण्यात आला. हल्ल्यानंतर तेल शुद्धीकरण प्रकल्पातील काही यूनिट्समध्ये आग लागली. त्यामुळे तातडीने आग विझवण्याचे काम हाती घेण्यात आले. या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही.
इराणमधील सर्वांत उंच पूल नष्ट
अमेरिकेचे राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांनी दावा केला की, अमेरिका इस्रायलने इराणमधील सर्वांत मोठा उंच पूल नष्ट केला आहे. स्थानिक अधिकाऱ्यांच्या मते, अलबोर्ज परिसरातील ‘बी-१’ ब्रिजवर मोठा हल्ला झाला. त्यात प्रचंड नुकसान झाले. हल्ल्यात ८ लोकांचा मृत्यू झाला, तर ९५ लोक जखमी झाले.
होर्मुझ सामुद्रधुनीवर संकट
आखाती प्रदेशातील तणाव शिगेला पोहोचला आहे. तेल वाहतुकीसाठी महत्त्वाच्या ‘होर्मुझ सामुद्रधुनी’वरही संकटाचे ढग दाटले आहेत. या संघर्षाचा जागतिक अर्थव्यवस्थेवर आणि ऊर्जा सुरक्षेवर गंभीर परिणाम होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.