राज्यात डेंग्यूची रुग्णसंख्या घटली; मार्चमध्ये केवळ ४ रुग्ण

डॉ.कल्पना महात्मे यांची माहिती : गेल्या तीन महिन्यांत आढळलेले बहुतेक रुग्ण स्थलांतरित कामगार

Story: प्रतिनिधी। गोवन वार्ता |
03rd April, 11:30 pm
राज्यात डेंग्यूची रुग्णसंख्या घटली; मार्चमध्ये केवळ ४ रुग्ण

पणजी : आरोग्य खात्याने विविध उपाययोजनांमुळे राज्यातील डेंग्यू नियंत्रणात येत आहे. यंदा मार्च महिन्यात डेंग्यूचा केवळ ४ रुग्ण आढळले. मागील वर्षीच्या मार्चमध्ये डेंग्यूचे ७ रुग्ण आढळले होते. तर मार्च २०२४ मध्ये २१ रुग्ण आढळले होते. डेंग्यूच्या हॉटस्पॉट ठिकाणी जाऊन तेथील डासांच्या उत्पत्तीची स्थळे नष्ट करणे, स्वच्छतेबाबत जागृती करणे, यामुळे डेंग्यूचे रुग्ण कमी आढळल्याची माहिती राष्ट्रीय वेक्टर बोर्न रोग नियंत्रण कार्यक्रमाच्या उपसंचालिका डॉ.कल्पना महात्मे यांनी दिली.
मार्च २०२६ मध्ये मडगाव, कासावली, कुठ्ठाळी आणि कुडतरी येथे प्रत्येकी एक रुग्ण आढळला होता. राज्यात चालू वर्षातील पहिल्या तीन महिन्यांत आढळलेले बहुतेक रुग्ण हे स्थलांतरित कामगार वस्तीमधील किंवा बांधकाम प्रकल्पात राहणारे कामगार आहेत. येथे उघड्यावर पाणी साठवून ठेवल्याने त्यामध्ये डासांची पैदास होऊन डेंग्यू रुग्ण आढळले आहेत. अन्य राज्यातील डेंग्यू हॉटस्पॉट ठिकाणांहून स्थलांतरित कामगार राज्यात येत असल्याने राज्यात डेंग्यूचे रुग्ण आढळत आहेत.
डेंग्यू नियंत्रणात आणण्यासाठी घरातील कुंड्या, फ्रीज खाली किंवा अन्य ठिकाणी साचलेले अथवा साठवलेले पाणी आठवड्यातून दोन वेळेस साफ करणे आवश्यक आहे. पाणी टंचाई असेल, तर पाणी साठवून त्यावर घट्ट झाकण लावल्यास त्यात डासांची पैदास होत नाही. असे पाणी सात दिवसांत वापरले गेले पाहिजे. खात्यातील अधिकारी घरोघरी जाऊन जागृती करत आहेत. स्थानिक पंचायतींना सोबत घेऊन डासांच्या पैदासीची ठिकाणे नष्ट करण्याचे काम सुरू असल्याचे डॉ. महात्मे यांनी सांगितले.
रुग्ण संख्या
महिना           २०२३    २०२४   २०२५   २०२६

जानेवारी        ४          ३५      ७          ६
फेब्रुवारी        ७         २०        ९          १
मार्च             १३        २२         ७         ४            

हेही वाचा