भाजप प्रदेशाध्यक्ष दामू नाईक, उमेदवार रितेश नाईक आणि कार्यकर्त्यांचा हॉटेलमध्ये रंगला गप्पांचा फड. ठरली प्रचाराच्या शेवटच्या टप्प्यातील रणनीती.

पणजी : फोंडा विधानसभा पोटनिवडणुकीचा संग्राम सध्या शिगेला पोहोचला असून, सर्वच राजकीय पक्षांनी प्रचाराचा धडाका लावला आहे. कडाक्याच्या उन्हात घरोघरी जाऊन 'आपल्याच उमेदवाराला मत द्यायचे हं!' म्हणत मते मागताना थकलेल्या कार्यकर्त्यांना उभारी देण्यासाठी आणि प्रचाराच्या पुढील रणनीतीवर चर्चा करण्यासाठी भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांनी रविवारी एक अनोखा 'टी ब्रेक' घेतला. भाजप प्रदेशाध्यक्ष दामू नाईक, माजी आमदार दयानंद सोपटे आणि भाजप उमेदवार रितेश नाईक यांनी फोंडा येथील एका स्थानिक हॉटेलमध्ये समर्थकांसह एकत्र येत 'चाय पे चर्चा' केली.

प्रचाराच्या धावपळीतून काही वेळ बाजूला काढत या नेत्यांनी कार्यकर्त्यांसोबत चहा, मिरची भजी, वडापावचा आस्वाद घेतला. यावेळी पत्रकारांशी बोलताना भाजपचे प्रदेशाध्यक्ष दामू नाईक यांनी भाजपच्या संघटन शक्तीवर प्रकाश टाकला. ते म्हणाले की, भाजप हा पैशाच्या जोरावर चालणारा पक्ष नसून तो कार्यकर्त्यांच्या संघर्षावर आणि निष्ठेवर उभा आहे. रितेश नाईक हे एक सुशिक्षित, मृदू भाषिक आणि सोज्वळ उमेदवार आहेत. त्यांचे वडील माजी मुख्यमंत्री रवी नाईक यांनी पाहिलेली फोंड्याच्या विकासाची स्वप्ने पूर्ण करण्याची उमेद रितेश यांच्यात असल्याचे त्यांनी नमूद केले.

दामू नाईक यांनी पुढे सांगितले की, मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी फोंड्याला 'एज्युकेशन हब' बनवण्याचे जे व्हिजन मांडले आहे, ते तरुणांसाठी भविष्यात मोठी संधी ठरेल. केंद्रातील मोदी सरकार आणि राज्यातील भाजप सरकार या 'डबल इंजिन' सरकारमुळेच गोव्याचा सर्वांगीण विकास शक्य झाला आहे. यावेळी भाजपची संपूर्ण यंत्रणा आणि जुने-नवे कार्यकर्ते ज्या ताकदीने रितेश नाईक यांच्या पाठीशी उभे राहिलेले दिसत आहेत, त्यावरून भाजपचा विजय निश्चित असल्याचे त्यांनी ठामपणे सांगितले.

भाजप उमेदवार रितेश नाईक यांनी यावेळी बोलताना कार्यकर्त्यांचे आणि नेत्यांचे आभार मानले. ते म्हणाले की, आम्ही एका कुटुंबाप्रमाणे काम करत आहोत. गेल्या काही दिवसांत आम्हाला मिळणारा जनपाठिंबा सातत्याने वाढत आहे. ९ एप्रिल रोजी होणाऱ्या मतदानात फोंड्याचे मतदार ३ नंबरच्या 'कमळ' चिन्हासमोरील बटण दाबून मला प्रचंड मताधिक्याने विजयी करतील, याची मला खात्री आहे. माजी आमदार दयानंद सोपटे यांनीही यावेळी कार्यकर्त्यांच्या निष्ठेचे कौतुक करत विजयाचा विश्वास व्यक्त केला.

प्रचाराच्या व्यस्त वेळापत्रकातून वेळ काढत भाजपचे नेते, पदाधिकाऱ्यांनी अशा प्रकारे एकत्र बसून चहा-नाश्ता केल्यामुळे कार्यकर्त्यांमध्येही नवा उत्साह पाहायला मिळाला. एक प्रकारे कार्यकर्त्यांशी संवाद साधून त्यांना निवडणुकीच्या शेवटच्या टप्प्यासाठी सज्ज करण्याची रणनीती आखण्याचा भाजपचा प्रयत्न आहे.
