फोंडा पोटनिवडणूक: १७१ मतदारांनी बजावला पोस्टल बॅलेटद्वारे मतदानाचा हक्क

नोंदणीकृत १७६ पैकी पाच जणांचे मतदान हुकले; टपाल मतपत्रिका स्ट्रॉन्ग रूममध्ये सुरक्षित

Story: प्रतिनिधी | गोवन वार्ता |
05th April, 03:45 pm
फोंडा पोटनिवडणूक: १७१ मतदारांनी बजावला पोस्टल बॅलेटद्वारे मतदानाचा हक्क

पणजी : फोंडा विधानसभा पोटनिवडणुकीचा प्रचार अंतिम टप्प्यात पोहोचलेला असतानाच, प्रशासकीय पातळीवर मतदानाची प्रक्रिया संथपणे परंतु नियोजित रीतीने सुरू झाली आहे. या पोटनिवडणुकीसाठी टपाल मतदानाची (पोस्टल बॅलट) प्रक्रिया पूर्ण झाली असून, नोंदणी केलेल्या एकूण १७६ मतदारांपैकी १७१ जणांनी आपल्या मतदानाचा हक्क बजावला आहे. उर्वरित पाच मतदारांना आता नियमानुसार ९ एप्रिल रोजी होणाऱ्या मुख्य मतदानाच्या दिवशी मतदान करता येणार नाही, अशी स्पष्ट माहिती निवडणूक अधिकाऱ्यांनी दिली आहे.

माजी मुख्यमंत्री दिवंगत रवी नाईक यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या फोंडा मतदारसंघासाठी ९ एप्रिल रोजी प्रत्यक्ष मतदान होणार आहे. या निवडणुकीत काँग्रेस, भाजप आणि आम आदमी पक्षाने आपली पूर्ण ताकद पणाला लावली असून प्रचार शिगेला पोहोचला आहे. निवडणूक आयोगाच्या नियमानुसार ८५ वर्षांवरील ज्येष्ठ नागरिक, दिव्यांग व्यक्ती आणि निवडणुकीच्या दिवशी कर्तव्यावर असणारे पोलीस तसेच सरकारी कर्मचारी यांच्यासाठी टपाल मतदानाची विशेष सोय करण्यात येते. यासाठी इच्छुक मतदारांना आगाऊ नोंदणी करणे बंधनकारक असते.

निवडणूक विभागाने दिलेल्या आकडेवारीनुसार, ८५ वर्षांपेक्षा जास्त वय असलेल्या ११५ ज्येष्ठ नागरिकांनी टपाल मतदानासाठी नोंदणी केली होती, त्यापैकी ११२ जणांनी मतदान केले आहे. दिव्यांग श्रेणीमध्ये नोंदणी केलेल्या २९ मतदारांपैकी २८ जणांनी आपला हक्क बजावला. तसेच, निवडणुकीच्या दिवशी प्रत्यक्ष कामावर असणाऱ्या ३२ सरकारी कर्मचारी आणि पोलीस कर्मचाऱ्यांनी टपाल मतदानासाठी अर्ज केला होता, त्यापैकी ३१ जणांचे मतदान पूर्ण झाले आहे. अशा प्रकारे एकूण १७१ टपाल मते नोंदवण्यात आली असून, ही मते सध्या फोंडा येथील स्ट्रॉन्ग रूममध्ये अत्यंत कडक सुरक्षेत ठेवण्यात आली आहेत.

९ एप्रिल रोजी प्रत्यक्ष मतदान प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर, ही सर्व टपाल मते ईव्हीएम मशीनसोबत मडगाव येथील मतमोजणी केंद्रावर नेण्यात येणार आहेत. मतमोजणीच्या दिवशी सर्वप्रथम या टपाल मतांची मोजणी केली जाते आणि त्यानंतर ईव्हीएममधील मतांची गणना सुरू होते. फोंड्यातील ही पोटनिवडणूक राजकीयदृष्ट्या अत्यंत महत्त्वाची मानली जात असून, टपाल मतदानातील या उत्साहामुळे प्रत्यक्ष मतदानाच्या दिवशीही मतदारांचा मोठा प्रतिसाद लाभेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.


हेही वाचा