सीआझेड कायद्याचेही उल्लंघन

पणजी : हरमल (Harmal), पेडणे (Pernem) येथे शनिवारी पहाटे रेस्टॉरंटना (Restaurant) लागलेली आग ही ‘बर्च बाय रोमीओ लेन’ क्लबला (Birch by Romeo Lane Club) लागलेल्या आगी सारखाच प्रकार असल्याची बाब उपजिल्हाधिकाऱ्यांच्या अहवालानंतर उघड झाली आहे. आग शॉर्ट सर्कीटमुळे लागली असली तरी रेस्टॉरंट मालकांचा निष्काळजीपणा ही कारण असल्याचे अहवालात म्हटले आहे.
जिल्हाधिकारी कार्यालयातील सूत्रांकडून ही माहिती मिळाली. ज्या रेस्टॉरंटना आग लागली त्यांच्याकडे ‘फायर एनओसी’ (Fire NOC) नव्हती. आग विझवण्यासाठी ‘फायर एक्स्टींग्युशर किंवा कसलीच तात्पुरती व्यवस्थाही नव्हती. घरांच्या मागे वाढवून रेस्टॉरंट करण्यात आली आहेत. समुद्रकिनाऱ्यावर अतिक्रमण होऊन सीआरझेड कायद्याचे उल्लंघन झाले आहे.
पंचायतीने पाहणी करून अतिक्रमणाविरोधात कायद्याप्रमाणे कारवाई करावी, अशी शिफारस आहे. रेस्टॉरंटाजवळ वीज वाहिन्या असल्याने; वीज खात्याने आवश्यक ते सुरक्षेचे उपाय करावेत. रेस्टॉरंटजवळ एफडीएचे परवाने नाहीत तसेच कसल्याच प्रकारचे शुल्क भरलेली कागदपत्रे मालकांकडे नाहीत.
उपजिल्हाधिकाऱ्यांनी चौकशी करण्यासहीत आवश्यक ती कारवाई करण्याविषयी पत्रे एफडीए तसेच पर्यटन खात्याला लिहिली आहेत. रेस्टॉरंटंना लागलेल्या आगीची चौकशी करून अहवाल सादर करण्याचे आदेश उत्तर गोवा जिल्हाधिकाऱ्यांनी पेडणे उपजिल्हाधिकाऱ्यांना दिले होते. त्याप्रमाणे अहवाल सादर करण्यात आला आहे.
हरमल येथे शनिवारी पहाटे आग लागून रेस्टॉरंटंचे लाखांनी रुपयांचे नुकसान झाले होते. ही घटना धोकादायक आहे. अशा घटनांमुळे जीविताला सुद्धा धोका निर्माण होणे शक्य आहे. आग लागलेल्या रेस्टॉरंटंजवळ असलेले परवाने, प्रमाणपत्रे तसेच एनओसीची तपासणी पेडणे उपजिल्हाधिकाऱ्यांनी केली.
शनिवारी पहाटे विजेच्या खांबांवर स्पार्क होऊन खालचावाडा-हरमल येथे आग लागली. त्यात ६ रेस्टॉरंटंचे मोठे नुकसान झाले. अग्निशमन दलाने ग्रामस्थांच्या मदतीने आग विझवली होती. ही आग शॉर्ट सर्कीटमुळे लागली असली तरी रेस्टॉरंट्स बेकायदेशीरपणे चालवली जात होती, असे स्पष्ट झाले आहे.