बँक मॅनेजरने कट रचून व्यापाऱ्याचे ३ लाख लुटले

माकाझान येथून ईडी अधिकारी असल्याचे सांगत केले अपहरण

Story: वेब डेस्क। गोवन वार्ता |
07th April, 05:23 pm
बँक मॅनेजरने कट रचून व्यापाऱ्याचे ३ लाख लुटले

मडगाव : ईडीचे अधिकारी (ED Officer)  असल्याचे सांगत माकाझन (Macazan) येथून व्यावसायिकाचे अपहरण करून कारवार (Karwar)  येथे नेत ३ लाख रुपये लुटले. या प्रकरणात कॅनरा बँकेच्या माकाझन शाखेच्या व्यवस्थापकाला (Canara Bank Macazan Branch Manager)  अटक करण्यात आली. पोलीस तपासात (Police investigation)  व्यवस्थापकानेच सहकाऱ्यासोबत मिळून कट रचत पैसे लुटल्याचे समोर आले.

 दक्षिण गोव्यातील (South Goa)  एका व्यावसायिकाच्या अपहरणाच्या घटनेने व्यापार्‍यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. मात्र; पोलीस तपासात बँक मॅनेजरने कट रचत लुटल्याचे समोर आले. २४ मार्च रोजी माकाझान येथे ही अपहरणाची घटना घडली. व्यावसायिक अशोक कुमार (५६, रा. बोर्डा, फातोर्डा) यांनी मायणा कुडतरी पोलिसांत तक्रार नोंद केली.

मिळालेल्या माहितीनुसार, अशोक कुमार हे २४ मार्च रोजी दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास माकाझान येथे बँकेत गेले होते. बँकेतून येत असताना संशयितांनी त्यांना अडवले. त्यांना आपण अंमलबजावणी संचालनालयाचे अधिकारी असल्याचे सांगितले व कोणतीही गडबड न करता आपल्यासोबत येण्यास सांगितले. संशयितांनी अशोक कुमार यांना त्यांच्या ह्युंदाई कारमध्ये जबरदस्तीने बसवले व त्यांना कर्नाटक येथील कारवार येथे नेले. कारवार येथील एका निर्जनस्थळी अशोक कुमार यांना नेले.

तेथे त्यांना जीवे मारण्याची धमकी देत त्यांच्याकडील ३ लाखांची रक्कम हिसकावून घेतली. अशोककुमार यांना निर्जनस्थळी सोडून संशयितांनी पळ काढला. याप्रकरणी व्यावसायिक अशोक कुमार यांनी नीलेश जाधव, बलराम शेट्टी, अजित आणि इतर काही अनोळखी व्यक्तींविरुद्ध तक्रार दिली. त्यानंतर मायणा-कुडतरी पोलिसांनी गुन्हा नोंदवला. पोलीस निरीक्षक कपिल नायक यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक प्रफुल्ल गिरी याप्रकरणी तपास करीत आहेत. तांत्रिक देखरेखीच्या आधारे व इतर पुराव्यांच्या आधारे पोलिसांनी कॅनरा बँकेच्या

माकाझन शाखेचा व्यवस्थापक अजित कुमार कट्टिमणी याला अटक केली. संशयित अजितकुमार याने आपल्या इतर सहकाऱ्यांसोबत मिळून पणजी येथील एका कॅफेमध्ये बसून हा कट रचला होता. अपहरण व लुटीचा प्रकार घडला; त्यावेळी संशयित अजितकुमार व सहकारी एकमेकांच्या संपर्कात होते; असेही दिसून आलेले आहे. या प्रकरणात इतर संशयितांना लवकरच अटक केली जाईल असे मायणा कुडतरी पोलिसांनी सांगितले.

हेही वाचा