राज्यपालांचे मत : राष्ट्रकुल संसदीय संघाच्या परिषदेचा समारोप

परिषदेत राज्यपाल पुसापती अशोक गजपती राजू यांचा सन्मान करताना सभापती गणेश गावकर. सोबत लोकसभेचे अध्यक्ष ओम बिर्ला आणि गोवा विधानसभेचे उपसभापती जोशुआ डिसोझा.
...
प्रतिनिधी। गोवन वार्ता
पणजी : सभागृहाच्या कामकाजात वारंवार अडथळा आणल्यास अथवा विधिमंडळाला कमी कालावधी दिल्यास लोकप्रतिनिधींना त्यांचे घटनात्मक कार्य करण्याची संधी मिळत नाही. यामुळे पुरेशा कालावधीसाठीचे अधिवेशन असणे आवश्यक आहे, असे स्पष्ट मत राज्यपाल पुसापती अशोक गजपती राजू यांनी व्यक्त केले.
राष्ट्रकुल संसदीय संघाच्या परिषदेच्या समारोप सोहळ्यात ते बोलत होते. यावेळी लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला, सभापती गणेश गावकर, उपसभापती जोशुआ डिसोझा उपस्थित होते. राज्यपाल पुढे म्हणाले, चर्चा, मतभेद ही आरोग्यदायी लोकशाहीची लक्षणे आहेत. अशा चर्चा नियमानुसार आणि सन्मानपूर्वक पद्धतीने होणे तितकेच महत्त्वाचे आहे. धोरणे तयार करण्यासाठी विधिमंडळ संस्था महत्त्वाच्या आहेत. यामुळे त्यांच्या कामकाजाचा कालावधी पुरेसा असणे आवश्यक आहे. सभागृहात देण्यात आलेल्या वेळेचा वापरदेखील योग्य कारणासाठी झाला पाहिजे. विधिमंडळ सदस्यांनी योग्य पद्धतीने वादविवाद करणे हेदेखील तेवढेच महत्त्वाचे आहे.
राज्यपाल म्हणाले, विधिमंडळ सदस्यांनी सभागृहात लोकांच्या समस्या मांडाव्यात. विरोधी पक्ष हे केवळ राजकीय विरोधक नाहीत, ते लोकशाहीच्या साच्यातील एक घटक असतात. प्रश्न उपस्थित करणे, वेगळा दृष्टिकोन मांडणे याद्वारे विरोधी पक्ष लोकशाहीला अधिक मजबूत करत असतात. सत्ताधारी आणि विरोधकांनी घटनात्मक जबाबदाऱ्या पार पाडल्या, त्यांनी नियमानुसार एकत्रितपणे काम केले, तर ते लोकशाहीसाठी उपयुक्त ठरते. या परिषदेत मांडण्यात आलेल्या संकल्पना विधिमंडळ संस्थेसह लोकशाही अधिक मजबूत करण्यासाठी उपयुक्त ठरणार आहेत.
गोव्यातील परिषद ठरणार ऐतिहासिक : ओम बिर्ला
ओम बिर्ला म्हणाले की, गोव्यातील समुद्र किनारे, सुंदर निसर्ग यामुळे येथे आल्यावर वेगळीच ऊर्जा प्राप्त होते. गोव्यात पार पडलेली ही परिषद ऐतिहासिक ठरणार आहे. येथे झालेल्या संवादातून भविष्यातील धोरणे ठरवली जाणार आहेत. येथे मिळालेल्या अनुभवाचा वापर लोकप्रतिनिधींनी आपल्या मतदारसंघाचा विकास करण्यासाठी करून घ्यावा.